अर्थमंत्री निर्मला सीतारामन कतार दौऱ्यावर

 


एआयआयबीच्या वार्षिक बैठकीला उपस्थित राहणार

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन २७ ते २९ सप्टेंबरदरम्यान कतारच्या अधिकृत दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात त्या दोहा येथे २८ सप्टेंबर रोजी होणाऱ्या एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकच्या (एआयआयबी) ११व्या वार्षिक बैठकीला उपस्थित राहणार असल्याची माहिती अर्थ मंत्रालयाने रविवारी दिली.

एआयआयबीच्या वार्षिक बैठकीत सीतारामन या भारताच्या गव्हर्नर म्हणून सहभागी होणार आहेत. एआयआयबीमध्ये भारत हा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा भागधारक देश आहे.

दौऱ्यादरम्यान सीतारामन एआयआयबीच्या अध्यक्षांसोबत तसेच जॉर्डन, स्वित्झर्लंड, अल्जेरिया, सौदी अरेबिया आणि नेपाळच्या समकक्ष मंत्र्यांसोबत द्विपक्षीय बैठका घेणार आहेत. या बैठकींमध्ये विविध आर्थिक आणि द्विपक्षीय विषयांवर चर्चा होण्याची अपेक्षा आहे.

अर्थमंत्री कतार सरकारच्या वरिष्ठ नेतृत्वाचीही भेट घेणार आहेत. तसेच कतारमधील उद्योगपती आणि गुंतवणूकदारांशी संवाद साधणार आहेत.“केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहारमंत्री निर्मला सीतारामन २७ ते २९ सप्टेंबर २०२६ दरम्यान कतारच्या अधिकृत दौऱ्यावर जाणार आहेत,” अशी माहिती अर्थ मंत्रालयाने सोशल मीडिया पोस्टद्वारे दिली.

या अधिकृत दौऱ्यासाठी अर्थ मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या शिष्टमंडळाचे सीतारामन नेतृत्व करणार आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post