मुंबई : सणासुदीच्या काळात भेसळयुक्त आणि असुरक्षित अन्नपदार्थांची विक्री रोखण्यासाठी महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (FDA) वर्षभरातील सर्व सणांसाठी कायमस्वरूपी ‘स्टँडिंग ऑर्डर’ जारी केली आहे. त्याच्या प्रभावी, पारदर्शक आणि वेळेत अंमलबजावणीसाठी स्वतंत्र ‘फेस्टिव्हल एन्फोर्समेंट पोर्टल’ सुरू करण्यात आले आहे.
सणांच्या काळात मोदक, पेढा, खवा, पनीर, तूप, दूध, दही, खाद्यतेल आणि सुकामेवा तसेच उपवासाच्या पदार्थांमध्ये भगर, साबुदाणा आणि राजगिरा यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. या वाढलेल्या मागणीचा गैरफायदा घेत भेसळयुक्त किंवा असुरक्षित अन्न बाजारात येण्याचा धोका वाढतो, असे एफडीएने म्हटले आहे.
मकरसंक्रांतीपासून ख्रिसमसपर्यंत वर्षभरातील सर्व सणांची माहिती पोर्टलवर उपलब्ध आहे. सणांचे लेव्हल-१ (राज्यव्यापी), लेव्हल-२ (प्रादेशिक) आणि लेव्हल-३ (स्थानिक) असे वर्गीकरण करण्यात आले आहे.
गणेश मंडळे, संस्था आणि आयोजकांना भंडारा, अन्नछत्र व महाप्रसादाच्या आयोजनाची माहिती कार्यालयात न जाता ऑनलाइन देता येणार आहे. अर्ज, नियुक्त अधिकारी आणि प्रत्यक्ष तपासणीची स्थिती रिअल टाइममध्ये पाहता येणार आहे. राज्यातील ९० झोनसाठी विशेष अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
दरम्यान, पोर्टलवर भंडारा, अन्नछत्र आणि महाप्रसादासाठी ३,१९८ ऑनलाइन अर्ज प्राप्त झाले. जोखमीच्या आधारे अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी ३८३ ठिकाणी प्रत्यक्ष तपासणी केली. राज्यभर १ ते २३ सप्टेंबरदरम्यान ३,०६८ अन्न आस्थापनांची तपासणी करण्यात आली.
त्रुटी आढळलेल्या १,५०६ आस्थापनांना सुधारणा नोटिसा देण्यात आल्या. गंभीर उल्लंघन करणाऱ्या २४८ आस्थापनांचे परवाने निलंबित, तर १२ परवाने रद्द करण्यात आले. कायद्याच्या कलम ६९ अंतर्गत ४५५ प्रकरणे दाखल करण्यात आली असून, त्यापैकी ३९८ प्रकरणांचा निपटारा करून ₹५३.६० लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
.jpeg)