खासदार डॉ. श्रीकांत शिंदे व नरेश म्हस्के यांच्या पाठपुराव्याला यश; कोकणवासीयांमध्ये उत्साह
ठाणे : मुंबई CSMT–सावंतवाडी रोड एक्स्प्रेस अखेर कोकणवासीयांच्या सेवेत दाखल झाली. या बहुप्रतीक्षित रेल्वेसेवेचे गुरुवारी ठाणे स्थानकात शिवसेनेच्या वतीने मोठ्या उत्साहात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले. ढोल-ताशांचा गजर, घोषणांचा निनाद आणि कोकणवासीयांच्या चेहऱ्यावरील आनंद यामुळे ठाणे स्थानक परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि खासदार नरेश म्हस्के यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश आले असून, मुंबई, ठाणे आणि कोकणाला जोडणारी ही नवी रेल्वेसेवा कोकणवासीयांसाठी महत्त्वाची ठरणार आहे. या एक्स्प्रेसमुळे कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना अधिक सोयीस्कर आणि सुरक्षित प्रवासाचा पर्याय उपलब्ध झाला आहे.
एक्स्प्रेस ठाणे स्थानकात दाखल होताच शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी ढोल-ताशांच्या गजरात तसेच घोषणांच्या निनादात तिचे उत्स्फूर्त स्वागत केले. यावेळी कोकणवासीयांची मोठी उपस्थिती होती. या ऐतिहासिक क्षणाचा आनंद व्यक्त करताना महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी, कोकणवासीयांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहताना हा क्षण अभिमानाचा वाटत असल्याची भावना व्यक्त केली.
मुंबई, ठाणे आणि कोकण यांना जोडणारी ही रेल्वेसेवा केवळ प्रवासाची सुविधा नसून कोकणवासीयांच्या दैनंदिन जीवनाला अधिक गती, सुरक्षितता आणि सोयीस्कर कनेक्टिव्हिटी देणारे महत्त्वाचे पाऊल आहे. विशेषतः मुंबई आणि ठाणे परिसरात वास्तव्यास असलेल्या कोकणवासीयांना आपल्या मूळ गावी जाण्यासाठी या एक्स्प्रेसचा मोठा फायदा होणार आहे.
कोकणातील नागरिकांची अनेक दिवसांपासून असलेली रेल्वेसेवेची मागणी पूर्ण करण्यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि खासदार नरेश म्हस्के यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांमुळे ही बहुप्रतीक्षित एक्स्प्रेस सुरू झाल्याने कोकणवासीयांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी शिवसेना उपनेते तथा आमदार रवींद्र फाटक, गटनेते पवन कदम, शहरप्रमुख हेमंत पवार, नौपाडा-कोपरी प्रभाग समिती सभापती मीनल संखे, नगरसेवक राजेंद्र फाटक, नगरसेवक दीपक वेतकर, संजय वाघुले यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, शिवसैनिक, कार्यकर्ते आणि कोकणवासीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोकणवासीयांची अनेक दिवसांची मागणी पूर्ण झाल्याने या नव्या एक्स्प्रेसचे स्वागत करताना उपस्थितांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि खासदार नरेश म्हस्के यांचे मनःपूर्वक अभिनंदन व आभार व्यक्त केले.


