तब्बल 80 लाख रुपये खड्डे बुजवण्यासाठी

  •    करदात्या नागरिकांचे पैसे का वाया घालवता ?
  •  सामाजिक कार्यकर्त्याचा  प्रश्न  

डोंबिवली : रस्ता उत्कृष्ट बनवा अशी मागणी आजवर नागरिक करत असताना प्रशासनाकडून वारंवार खड्डे बुजवले जातात. शहरात केंद्रीय मंत्री,राज्य मंत्री येणार असल्याने शहरातील रस्ते खड्डे बुजवले जात असून हे चित्र नागरिकांना नवीन नाही.12 तारखेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे डोंबिवली शहरात आले होते. मुख्यमंत्र्यांना डोंबिवलीतील रस्ते चकाचक दिसावे याकरिता रस्त्यातील खड्डे डांबरीकरण करून बुजवण्यात आले. मात्र दोन -तीन दिवसात यात रस्त्यावर खड्डे दिसत असल्याने हे निकृष्ट दर्जाचे काम झाल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ता सत्यवान म्हात्रे यांनी केला आहे. म्हात्रे यांनी माहिती अधिकारात सदर कामाची माहिती मागितली असता या कामासाठी तब्बल 80 लाख रुपये प्रशासनाकडून खर्च करण्यात आले. करदात्या नागरिकाचा पैसा अशाप्रकारे वाया जात असेल तर नागरिक कर भरताना विचार करतील असे म्हात्रे म्हणाले. या ठेकेदारावर आणि अभियंत्यावर कारवाई करा अशी मागणी म्हात्रे यांनी केली आहे.

        डोंबिवली पूर्वेकडील आर.आर.हॉस्पिटल समोरील रस्ता मिलापनगरला जोडणार्‍या रस्त्यापासून ते कावरे चौकापासून पुढे डांबरीकरण करण्यात आले. येथील रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी मे.जयभारत कंट्रक्शन (उल्हासनगर) यांना काम दिले होते.या कामासाठी  80,19,319 रुपयांची निविदा मंजूर झाली होती.12 तारखेला मुख्यमंत्री शिंदे हे डोंबिवलीत येणार असल्याने प्रशासनाकडून या रस्त्यावरील खड्डे डांबरीकरणाचे काम करण्यात आले होते.परंतु हे काम निकृष्ट दर्ज्याचे असल्याचा आरोप आजदेगावातील रहिवासी सामाजिक कार्यकर्ते सत्यवान म्हात्रे यांनी केला आहे. माहिती अधिकारात पालिकेच्या संबधित विभागाकडून माहिती मिळाल्यानंतर करदात्या नागरिकांचा पैसा अशा प्रकारे वाया जात असल्याचा आरोप म्हात्रे यांनी केला आहे. मात्र याबाबत पालिकेच्या दक्षता व गुणनियंत्रण विभाग यांच्याकडून डांबरीकरणबाबतचा चाचणी अहवाल प्राप्त झाल्यावर माहिती देण्यात येईल असे उत्तर म्हात्रे यांना देण्यात आले. 

या ठिकाणी टाकण्यात आलेल्या डांबरमध्ये खडी खराब मिक्स ऑईल करून वापरली जात असल्याचे म्हात्रे यांनी सांगितले. याबाबत म्हात्रे म्हणाले, प्रशासन उत्कुष्ट दर्ज्याचे काम करत नाही ? रस्ते चांगले बनविले तर खड्डे बुजवण्यासाठी लाखो रुपये खर्च करण्याची वेळ प्रशासनावर येणार नाही. येथील रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी खर्च केलेले 80 लाख रुपयांचा वापर नागरिकांच्या आरोग्य व शिक्षणावर करता आला असता.या निकृष्ट दर्ज्याचे काम करणार्‍या ठेकेदारावर व अभियंत्यावर कारवाई करावी अशी मागणी म्हात्रे यांनी केली आहे.






Post a Comment

Previous Post Next Post