डोंबिवली पूर्व स्टेशनपरिसर फेरीवाल्यांपासून मुक्त

  •  रस्त्यावर रिक्षांचा अनधिकृत थांबा 
डोंबिवली : डोंबिवली पश्चिम बाहेरील स्टेशन परिसर अनेक वर्षांपासून फेरीवाला मुक्त परिसर आहे.आता डोंबिवली पूर्वेकडील स्टेशन बाहेरील कैलास लस्सी पासून पुढील १५० मीटर परिसर फेरीवाला मुक्त होण्याच्या मार्गावर आहे.'फ'प्रभाग क्षेत्र सहायक आयुक्त भरत पाटील यासह पथकातील कर्मचारी फेरीवाल्यांना कारवाई करत असल्याने स्टेशन परिसरात नागरिकांना चालण्यास अडचण येत नाही.
   पथकप्रमुख मिलिंद गायकवाड यांसह कर्मचारी स्टेशन बाहेरील 150 मीटर अंतराच्या आत बसणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई करतात.कामावरून परत घरी येताना डोंबिवलीकरांना सायंकाळी 7 नंतर स्टेशनबाहेर फेरीवाले बसलेले दिसत असल्याने प्रशासनाच्या नावाने बोटे मोडतात.मात्र आता असे होतांना दिसणार नाही असे सहायक आयुक्त भरत पाटील यांनी सांगितले.शुक्रवारी सकाळपासून पाटील आणि पथक कर्मचारी स्टेशनबाहेरील परिसरात फेरीवाल्यांना हटविण्याचे काम करत होते.यावेळी नागरिकांनीही पालिकेच्या कामाचे कौतुक केले.यावेळी नोंदणीकृत फेरीवाल्यांना बसण्यासाठी जागा द्यावी अशी विनंती फेरीवाल्यांनी पाटील यांच्याकडे केली असता 150 मीटर अंतरात बसू नका, आमची कारवाई सुरूच राहील असे पाटील यांनी फेरीवाल्यांना सांगितले.

 फेरीवाला मुक्त फुटपाथ करण्यासाठी पथक सज्ज
स्टेशन बाहेरील फुटपाथवर दुकानदारांनी आणि फेरीवाल्यांनी अतिक्रमण केल्याने नागरिकांना रस्त्यावरून चालावे लागते.याकडे लक्ष देत सहायक आयुक्त भरत पाटील यांनी फुटपाथवरील अतिक्रमण हटवा, कडक कारवाई करा असे निर्देश पथकांना दिले आहे.कैलास लस्सीला लागून असलेले फुटपाथ व समोरील फुटपाथवर अतिक्रमण हटविले जाणार असल्याने दुकानदार धास्तावले आहेत.

रस्त्याचा ताबा रिक्षांनी घेतला
   एकीकडे स्टेशनबाहेरील फेरीवाले हटविण्याची कारवाई सुरू असताना दुसरीकडे या रस्त्याचा ताबा रिक्षांनी घेतल्याचे दिसते.कैलास लस्सी समोरील रस्त्यावर रिक्षा थांबा बनवला असल्याने नागरिकांनी यावर वाहतूक पोलीस शांत का असा प्रश्न उपस्थित केला आहे. यासंदर्भात पाटील हे वाहतूक पोलीस उपशाखेला कळविणार असल्याचे सांगितले.


Post a Comment

Previous Post Next Post