मुंबई : जपानमधील आघाडीची उद्योग कंपनी मित्सुबिशी हेवी इंडस्ट्रीजसाठी भारतात विशेष उत्पादन प्रकल्प उभारण्याचे काम आझाद इंजिनीअरिंग या देशातील अग्रगण्य कंपनीकडे सोपवण्यात आले आहे. आझाद इंजिनीअरिंग कंपनीने या प्रकल्पाची पायाभरणी करून या कामाचा शुभारंभ केला.
आझाद इंजिनीअरिंग प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक राकेश चोपदार यांच्या हस्ते या प्रकल्पाच्या कामाची पायाभरणी करण्यात आली. 11,800 चौरस मीटर जागेवर हा प्रकल्प उभारण्यात येत आहे. आझाद इंजिनीअरिंग आणि मित्सुबिशी दशकभरापूर्वीपासून एकत्रित काम करत आहेत. त्यांच्या कामाची सुरुवात काही मशीन्सनी झाली होती. आता ही वाटचाल उत्पादन प्रकल्प उभारण्यापर्यंत पोहोचली असून, या प्रकल्पामुळे त्यांच्या परस्पर सहकार्याला नवीन आयाम मिळाला आहे.
मित्सुबिशीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक टी. नागयासू, उप मुख्य कार्यकारी अधिकारी के. तनाका, उपमहाव्यवस्थापक एम हसेगावा, ब्लेड आणि कम्बशन पार्ट्स मॅन्युफॅक्चरिंग विभागाचे उपमहाव्यवस्थापक ताकासागो, अभियांत्रिकी विभाग प्रमुख राजा राम रेड्डी, तेलंगणच्या वाणिज्य, उद्योग आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे मुख्य सचिव जयेश रंजन, तेलंगणच्या एरोस्पेस आणि संरक्षण विभागाचे संचालक प्रवीण पी. ए. आमदार केपी विवेकानंद आणि राकेश चोपदार यावेळी उपस्थित होते.
यावेळी चोपदार यांनी 20 दशलक्ष डॉलर खर्चून उभारण्यात येणारा उत्पादन प्रकल्प 2024च्या मध्यापर्यंत कार्यान्वित होईल आणि येथे सुमारे 300 लोकांना रोजगार उपलब्ध होईल, असे जाहीर केले. आझाद इंजिनीअरिंगच्या एक्सलन्स अँड इनोव्हेशन सेंटरचा हा एक भाग असेल, असेही त्यांनी सांगितले.
राकेश चोपदार म्हणाले, एक विशेष सुविधा तयार करण्याची जबाबदारी मित्सुबिशीने आमच्यावर सोपवली हे आमच्या वचनबद्धतेचे आणि अथक परिश्रमाचे फळ आहे. जागतिक पातळीवरील आघाडीची उत्पादक कंपनी असलेल्या मित्सुबिशीसोबतच्या आमच्या दशकभराच्या व्यवसायातील हा एक अत्युच्च टप्पा आहे. उत्कृष्टतेसाठीच्या आझादच्या कटीबद्धतेची ही पावती आहे.
