पुण्यातील भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांचे निधन

 

कर्तव्यनिष्ठ, लढवय्या नेतृत्व आपण गमावले - मुख्यमंत्री 

लोकमान्य टिळकांचा वारसा लाभलेले एक लढवय्या नेतृत्व आपण गमावले,’ अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनाबद्दल श्रद्धांजली अर्पण केली आहे. मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात, लोकमान्य टिळकांचा वारसा असला, तरी आपल्या कामातून त्यांनी स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. त्यामुळेच पुणे महापालिकेत सलग चार वेळा नगरसेविका, नंतर पुण्याच्या महापौर आणि आमदार हा प्रवास त्या करू शकल्या. कर्करोगाशी झुंज देत असतानाही राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावून आपल्या कर्तव्यभावनेचा परिचय त्यांनी दिला. कर्तव्यनिष्ठ, लढवय्या नेतृत्व आपण गमावले आहे. आमदार मुक्ता टिळक यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

पुणे : पुण्यातील कसबा मतदार संघाचे आमदार टिळक यांचे अल्पशा आजाराने निधन झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर गॅलेक्सी रुग्णालयात उपचार सुरू होते. पण आज दुपारी टिळक यांनी अखेरचा श्वास घेतला. मुक्ता टिळक यांनी पुण्याचे महापौर पदही त्यांनी भूषवले होते.

विशेष म्हणजे महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर भाजपला सत्तेत बसण्यासाठी बहुमत सिद्ध करावे लागले होते. बहुमत सिद्ध करण्यासाठी भाजपला एक एक आमदारांचे मत महत्त्वाचे होते. त्यामुळे एवढ्या आजारपणातही अ‍ॅम्बुलन्सने त्या मुंबईत पोहचल्या होत्या.आणि बहुमतासाठी मतदानही केले होते. त्यांच्या या धाडसाचे विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौतुक केले होते.

 मुक्ता टिळक यांनी 2002 साली पहिली निवडणूक लढवली होती. तेव्हापासून त्या राजकारणात सक्रिय होत्या. त्या आता आमदार झाल्या असल्या तरी महापालिका निवडणुकीमध्ये त्या सर्वाधिक मतांनी निवडून येण्याचा मान त्यांना मिळाला होता. सर्वाधिक मतांनी निवडून आल्यानंतर त्यांचा मोठा गौरवही करण्यात आला होता. पुण्याच्या राजकारणात आल्यापासून त्यांनी महापौर पद आणि स्थायी समितीच्या सदस्या म्हणूनही त्यांनी काम केले होते.

पुण्याच्या महापालिकेमध्ये त्यांची कामगिरी श्रेष्ठ ठरल्यानंतर त्यांनी 2019 मध्ये त्यांनी पुण्यातील कसबा मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवली आणि त्यानंतर त्यांनी आपल्या कामामुळे आमदारकी मिळवली होती.


मुक्ताताई टिळक यांच्या निधनाने ध्येयनिष्ठ आणि समर्पित नेतृत्व हरपले - उपमुख्यमंत्री

 पुण्याच्या माजी महापौर आणि भारतीय जनता पक्षाच्या विद्यमान आमदार मुक्ताताई टिळक यांच्या निधनाने ध्येयनिष्ठ आणि समर्पित नेतृत्व हरपले आहे, अशा शोकसंवेदना व्यक्त करीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या संदेशात म्हणतात, मुक्ताताई या भारतीय जनता पक्षाच्या एकनिष्ठ कार्यकर्त्या होत्या. सुमारे 30 वर्ष त्यांनी पक्षासाठी मोठे योगदान दिले. पुण्याच्या महापौर म्हणून त्यांनी शहरात विविध विकासकामांना चालना दिली होती. विधानसभा सदस्य म्हणून काम करताना त्यांनी आपल्या कर्तव्यांना प्राधान्य दिले. अलीकडेच झालेल्या राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीत त्यांनी आजारपणातही मतदानात सहभाग नोंदवून लोकशाहीवरील आपली निष्ठा तसेच पक्षाचा उमेदवार जिंकलाच पाहिजे, यासाठी पक्षनिष्ठा दाखवून दिली होती. मी त्यांना या आजारपणात न येण्याची विनंती करूनसुद्धा त्या दोन्ही निवडणुकीत रुग्णालयातून मतदानाला आल्या होत्या. पुण्यात विविध सामाजिक कामे करताना सर्वसामान्य जनता आणि विशेषतः महिलांच्या जीवनात बदल घडवून आणण्याला त्यांचे प्राधान्य होते. या कठीण प्रसंगात आम्ही सारेच त्यांच्या कुटुंबियांच्या सोबत आहोत. हे दुःख सहन करण्याची शक्ती कुटुंबियांना लाभो, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.


Post a Comment

Previous Post Next Post