- भाविकांसाठी मास्क सक्ती
- ५ फुटांचे अंतर ठेवणे बंधनकारक
उल्हासनगर : कोरोनाने पुन्हा डोके वर काढले असून यावेळेस मोठी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात असल्यामुळे अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिर प्रशासनाने आतापासूनच भाविकांवर निर्बंध घालण्यात येणार आहे. दर्शनासाठी येताना मास्क सक्ती करण्यात येणार असून तसेच ५ फुटांच्या अंतरावरून दर्शन घेता येईल अशी नियमावली तायर करून त्याची अंमलबजावणी सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मंदिराचे पुजारी विजय पाटील यांनी दिली.
शिवमंदिरात दररोज पाच पन्नास भाविक दर्शनासाठी येतात. पण सोमवारी भाविकांच्या येणाऱ्यांची संख्या ही दोन हजाराच्या घरात असते. कोरोनाच्या लाटेची शक्यता आणि त्याचा फैलाव होऊ नये म्हणून अतिदक्षतेच्या दृष्टिकोनातून मास्कची सक्ती करण्यात आली आहे. त्यासोबतच भाविकांनी दर्शनासाठी ५ फुटांचे अंतर ठेवणे बंधनकारक आहे. भाविकांसाठी सॅनिटायजरची व्यवस्था करण्यात आली असून प्रथम त्याचा वापर करूनच दर्शनाच्यारांगेत उभे राहावे लागणार आहे. सोमवारपासून या नियमांची अंमलबजावणी काटेकोरपणे सुरू करण्यात येणार असून त्यावर लक्ष ठेवण्यासाठी मंदिराचे सेवाधारी तैनात असणार असल्याचे विजय पाटील यांनी सांगितले.
