दिवा डंपिंग ग्राऊंड 31 जानेवारीपर्यंत पूर्णतः बंद होणार

 


  • दिवा महोत्सवात ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के यांची ग्वाही


दिवा : दिव्यातील डंपिंगमुळे येथील नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. संपूर्ण धूर नागरी वस्तीत पसरत आहे. त्यामुळे या नवीन वर्षात 31 जानेवारी 2023 पर्यंत दिवा डंपिंग ग्राऊंडवर टाकण्यात येणारा कचरा पूर्णतः बंद करणार असल्याची ग्वाही ठाण्याचे माजी महापौर आणि आत्ताचे बाळासाहेबांच्या शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी दिली. नरेश म्हस्के यांनी दिवा डंपिंग बंद करण्याबाबत दिवेकर नागरीकांना दिलासा दिला.

गेली अनेक वर्षे दिव्यातील डंपिंग ग्राऊंड विविध कारणांसाठी चर्चेत आहे. दिव्यात डंपिंगवरून राजकीय आरोप आणि प्रत्यारोप नियमित होत असतात. ठाणे महानगरपालिका दिव्यातील डंपिंग बंद करत नसल्याच्या कारणास्तव दिवा भाजपतर्फे जेलभरो आंदोलन करण्यात आले होते. यासाठी ते नागरीकांसह रस्त्यावर उतरले होते. त्यामुळे आज दिवा महोत्सवानिमित आलेल्या ठाण्याच्या माजी महापौरांनी दिव्यातील नागरीकांचा हा प्रश्न कायस्वरुपी सोडविण्यासाठी येत्या 31 जानेवारी 2023 पर्यंत अखेरची तारिख दिली आहे. या तारखेनंतर दिव्यात ठाण्याचा कचरा टाकण्यात येणार नाही.  ते पूर्णतः बंद करणार असल्याचे जनसमुदारासमोर सांगितले आहे. यामुळे येथील नागरिकांसाठी हे वक्तव्य दिलासादायक आहे.

दिवा डंपिंगमुळे येथील नागरिकांच्या जनजीवनावर विपरित परिणाम करीत आहे. येथील कचऱ्याला काही नागरिक वारंवार आग लावून इतरत्र धूर पसरवित असतात. हा धूर शहरात मुख्यवस्तीत पसरत असल्याने येथील नागरिकांना श्वास घेण्यासही त्रास होत  आहे. दिव्यात आधीच सरकारी हॉस्पिटलची सुविधा नसल्याने तेथील नागरिकांच्या अडचणीत वाढ होत आहे. श्वास मिळावा ही सामान्य नागरिकांची अपेक्षा आहे. आता ही दखल ठाण्याच्या माजी महापौरांनी घेतल्याने नागरिकांचा कोंडलेला श्वास मोकळा होण्याचे संकेत आहेत.

काल चौदाव्या दिवा महोत्सवाची विविध मान्यवरांच्या उपस्थितीत सांगता झाली.यावेळी खासदार श्रीकांत शिंदे, ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के, माजी उपमहापौर रमाकांत मढवी, यांच्यासह दिव्यातील सर्व माजी नगरसेवक व नगरसेविका, बाळासाहेबांच्या शिवेसनेचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post