मुंबई: भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त मुंबईमधील दादर, शिवाजी पार्क येथे आयोजित मुख्य शासकीय समारंभात माननीय राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व इतर मान्यवरांच्या उपस्थित झालेल्या या समारंभात संचलनामध्ये महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांचे चित्ररथ सहभागी झाले.
गृहनिर्माण विभागातर्फे महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचा (म्हाडा) रथ वसुधैव कुटुंबकम् या राष्ट्रीय एकात्मकतेचा संदेशावर निर्माण करण्यात आला.
म्हाडा गृहनिर्मिती क्षेत्रातील देशातील अग्रगण्य संस्था आणि सर्वसामान्यांच्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करणारी सर्वसामान्यांची अत्यंत जिव्हाळ्याची संस्था आहे. गृहनिर्मितीच्या सात दशकांच्या प्रवासात राज्यातील सात लाख नागरिकांना हक्काचे घर परवडणाऱ्या दरात मिळवून देऊन देशातील सर्वात मोठा परिवार निर्माण करण्याचे श्रेय म्हाडाला जाते. त्यामुळेच 'वसुधैव कुटुंबकम' या उक्तीला सार्थकी लावत राष्ट्रीय एकात्मकतेच्या संदेशावर आधारित म्हाडाचा 'गृहरत्नभूषणम' चित्ररथ निर्माण करण्यात आला आहे.
चित्ररथाच्या सुरवातीला दिसणारी 'म्हाडा'ची इमारत गृहनिर्मितीच्या नांदीचे द्योतक आहे. म्हाडाच्या माध्यमातून सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात हक्काच्या घराची स्वप्नपुर्ती होत आहे. बीडीडी पुनर्वसन प्रकल्प, पत्रा चाळ पुनर्वसन प्रकल्प, सैफी बुरहाणी समूह विकास पुनर्विकास प्रकल्प, कामाठीपुरा पुनर्वसन प्रकल्प यांसारख्या अनेक महत्त्वाकांक्षी पुनर्विकास प्रकल्पांच्या माध्यमातून मुंबईत मोठ्या प्रमाणात गृहनिर्मिती होणार असून नागरिकांच्या जीवनमानाचा दर्जा देखील उंचावणार आहे. प्रधानमंत्री आवास योजन (शहरी) च्या राज्यातील अंमलबजावणीच्या माध्यमातून सर्वांसाठी घरे या उद्दिष्टपूर्तीकडे म्हाडाची कटिबद्धता येथे दर्शवित आहोत.
गृहबांधणीच्या क्षेत्रात राज्यातच नव्हे तर देशातील शिखर संस्था म्हणून बहुमान मिळविणाऱ्या म्हाडाची कीर्ती जगभरात आहे. म्हाडाला सर्वोच्च स्थानावर नेण्याकरिता म्हाडाचे नऊ मजबूत हात म्हणजेच 'म्हाडा'ची राज्यातील नऊ विभागीय मंडळे आहेत. गृहनिर्मिती ते क्षेत्र विकास करण्याच्या उद्दिष्टांवर कार्यरत हे हात म्हणजेच विभागीय मंडळे आहेत. म्हाडाचे स्थान देशातच नव्हे तर या पृथ्वीतलावर सबळ करण्यास सदैव तत्पर असल्याचा संदेश केंद्रस्थानी प्रदर्शित करण्यात आला आहे.
या चित्ररथाच्या शेवटच्या भागात दर्शविण्यात आलेले घर म्हणजे महाड येथील तळिये गावातील ग्रामस्थांकरीता म्हाडाच्या माध्यमातून राबविण्यात आलेला पुनर्वसन प्रकल्प. सन २०२१ मध्ये महाड येथील तळिये गावात दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेमुळे सर्वस्व गमावलेल्या ग्रामस्थांचे अश्रू पुसण्याचा म्हाडाचा प्रयत्न म्हणजे सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण आहे. तीन हजार चौरस फुटांच्या भूखंडावर ६०० चौरस फुटांची स्वयंपूर्ण सदनिका प्रत्येकी लाभार्थ्यांना मिळणार आहे. म्हाडा सुमारे २६२ ग्रामस्थांना तळिये येथे हक्काचा निवारा निर्माण करून देत आहे.

