अनधिकृत इमारतीवरून पडल्याने दो मजूर गंभीर जखमी

दिवा : ठाणे महानगर पालिकेतील दिवा शहर हे अनधिकृत इमारतीचे माहेर घर म्हणून ओळखले जात असून दिव्यातील अनेक प्रभागात राजरोसपणे भूमाफियानी बेकायदेशीरपणे अनधिकृत इमारती उभारन्याचा जणूकाही सपाटा लावला आहे. दाटीवाटीने उभारल्या जाणाऱ्या अनधिकृत इमारतीमुळे इमारत उभारणीचे काम करणाऱ्या बांधकाम कामगारांबरोबर नागरिकांच्या जीवावर बेतले जात असल्याची घटना गुरुवारी घडली आहे.

 दिवा शहरातील पूर्वेकडील दिवा आगासन रोड परिसरात अनधिकृतपणे बांधकाम सुरु असलेल्या इमारतीवरून पाय घसरून जितेंद्र रजत( वय ४३) व राम साहू (वय ३९) हे दोन कामगार इमारतीच्या सातव्या मजल्यावरून खाली पडल्याने गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना घडल्याने दिव्यातील अनधिकृत इमारतीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. दिव्यात अनधिकृत बांधकामांचे सुरू असताना कोणतीही सुरक्षा घेतली जात नाही. तसेच एक मजला चढवतानाही किंवा कोणतेही काम करताना जाळी वापरली जात नाही. यामुळे हे अपघात होऊन कामगार मृत्युमुखी पडल्याच्या घटना दिव्यात घडत आहेत. हे कामगार काल थोडक्यात वाचले असून इमारतीच्या तळ मजल्याच्या दुकानांना असणाऱ्या छतावर ते कामगार आदळून खाली पडल्याने त्यांचा जीव वाचला असे प्रत्यक्ष दर्शीनी सांगितले.

अमोल केंद्रे, समाजसेवक - लो प्राईज सुपर मार्ट मागे सखाराम कॉम्प्लेक्स येथे एका मुलीचा मृत्यू ही इमारत बांधकामाच्या वेळी झाला होता. त्याअगोदर दिनांक 26/02/2020 रोजी सदगुरू नगर येथील इमारतीवरून पडून गरोदर महिला कामगाराचा मृत्यू झाला होता. तर दिनांक 7/12/2021 रोजी बांधकामांचे साहित्य घेवून जाणाऱ्या डंपरच्या अपघाताचा मुळे एका युवकाचा मृत्यू झाला होता, असे अनेक वेळा कामगारांचा, नागरिकांचा या अनधिकृत बांधकामांमुळे जीव गेला आहे. अश्या अनेक घटना घडत असूनही दिवा शहरात अनधिकृत बांधकामे जोरात सुरू असतात. ते कोणाच्या आशीर्वादाने. सदर बांधकामे करत असताना त्या कर्मचाऱ्यांना कोणत्याही प्रकारचे अपघातमध्ये दुखापत होवू नये म्हणून त्यांना साहित्य पुरवले जात नाही. इमारतीचे काम सुरू असताना त्या ठिकाणी कोणी पडू नये यासाठी जाळी लावणे गरजेचे असताना ही त्याकडे कोणी लक्ष देत नाही. यातून एकच दिसून येते गरीब जरी मेला तरी चालेल, त्याच्या परिवाराला मदत नाही दिली तरी चालेल पण बिल्डरांच्या बिल्डिंगचे बांधकाम पूर्ण झाले पाहिजे. कारण मरणारा सामान्य नागरिक असतो त्याच्या पाठी कोणी नसते. बिल्डरांनी स्वतः तरी जरा लाज बाळगून कमगारांना संरक्षण साहित्य देवून ज्या ठिकाणी बांधकामे सुरू आहे त्या ठिकाणी कोणी पडू नये, कोणाचा जीव जावू नये यासाठी इमारतीवर संरक्षण जाळी लावायला हवी. कामगारांचा विमा पॉलिसी काडून द्यायला हवी. ज्यावेळी असा अपघात होईल त्यावेळी त्या नागरिकांना त्याच्या परिवाराला आर्थिक मदत मिळायलाच हवी. एवढे जरी केले तरी बिल्डर व महानगरपालिकेचे या कामगारांच्या वरती खूप मोठे उपकार होतील. कारण यांच्या आयुष्यामध्ये कधीही बांधकाम बंद करणार नाहीत कारण बिल्डर आणि महानगरपालिका यांना सत्ताधाऱ्यांना फक्त स्वतःच्या पोटापुरता मलिदा खायची सवय लागली आहे. 

Post a Comment

Previous Post Next Post