- खेलो इंडिया युथ गेम्स २०२२-२३
- महाराष्ट्र-हिमाचल प्रदेश उपांत्य सामना रंगणार
इंदोर: सुपरस्टार रेडर हरजित, मनीषा आणि समृद्धी यांनी सर्वोत्तम खेळीच्या बळावर महाराष्ट्र महिला कबड्डी संघाला पाचव्या सत्रातील खेलो इंडिया युथ गेम्स ची उपांत्य फेरी गाठून दिली. निकिता लंगोटे च्या कुशल नेतृत्वात महाराष्ट्र महिला संघाने मंगळवारी गटातील तिसऱ्या लढतीत यजमान मध्य प्रदेश टीमला धूळ चारली. महाराष्ट्र महिला संघाने ४८-२६ असा २२ गुणांच्या आघाडीने दणदणीत विजय संपादन केला. या विजयासह महाराष्ट्राला अंतिम चार मध्ये आपला प्रवेश निश्चित करता आला. आता महाराष्ट्र आणि हिमाचल प्रदेश यांच्यात उपांत्य सामना रंगणार आहे.
निकिताच्या कुशल नेतृत्वात महाराष्ट्र संघाने दमदार सुरुवात करत पहिल्या हाफ मध्येच आपला विजय निश्चित केला होता. यादरम्यान हरजित, मनीषा, समृद्धी, प्रतीक्षा यांनी केलेली कामगिरी लक्षवेधी ठरली.
बोनस सुपरस्टार यशिकाने महाराष्ट्राच्या विजयामध्ये मोलाचे योगदान दिले. तिने यजमान मध्य प्रदेश विरुद्ध सामन्यात सर्वाधिक बोनस गुण संपादन केले. त्यामुळे संघाला मध्यंतरापर्यंत सामन्यात १० गुणांची आघाडी घेतली. यादरम्यान महाराष्ट्र संघाने २२-१२ असा स्कोअर नोंदवत आपला दबदबा निर्माण केला होता. त्यामुळे यजमान संघाला सुमार खेळीचा मोठा फटका बसला.
महाराष्ट्र महिला संघाला खेलो इंडिया मध्ये सोनेरी यश संपादन करण्याची मोठी संधी आहे. याच सुवर्णपदकापासून महाराष्ट्राचा महिला संघ अवघ्या दोन पावलावर आहे. महाराष्ट्र महिला संघाने उपांत्य फेरी गाठून किताबाचा आपला दावा मजबूत केला आहे. आता सेमी फायनल मध्ये हिमाचल प्रदेश चा पराभव करून महाराष्ट्र संघ अंतिम फेरी गाठण्यासाठी सज्ज झाला आहे. आपल्या दर्जेदार कामगिरीमध्ये सातत्य ठेवत संघातील युवा खेळाडू फायनल गाठण्यासाठी सज्ज झाले आहेत.
महाराष्ट्र महिला संघाने आखलेले डावपेच यशस्वी करून विजय साजरा केला आहे. त्यामुळे सलग दुसऱ्या विजयासह महाराष्ट्राला किताबाचा आपला दावा मजबूत करता आला आहे. महाराष्ट्र संघ आता उपांत्य सामना जिंकून अंतिम फेरी गाठण्यासाठी उत्सुक आहे. यासाठी आम्ही खास डावपेच आखणार आहोत. यातून विजयाचे टार्गेट आम्हाला यशस्वीपणे गाठता येईल, असा विश्वास मुख्य प्रशिक्षक गीता साखरे यांनी व्यक्त केला.