- भक्ती वाडकरचे सोनेरी यश
- मुलांच्या रिलेमध्येही महाराष्ट्राला विजेतेपद
भोपाळ/ विशेष प्रतिनिधी : महाराष्ट्राच्या खेळाडूंनी जलतरणा मधील पदकांची लयलूट कायम राखली. त्याचे श्रेय आज सुवर्ण चौकार पूर्ण करणारा वेदांत माधवन, बॅग स्ट्रोक शर्यतीत सुवर्णपदक जिंकणारी भक्ती वाडकर, रौप्य पदक जिंकणारी पलक जोशी, कांस्यपदक जिंकणारे शुभंकर पत्की, प्रतीक्षा डांगी यांना द्यावे लागेल. यांच्या या यशावर शिखर चढवताना मुलांच्या संघाने रिले शर्यतीत महाराष्ट्राचा दबदबा कायम राखला.
वेदांत याने आज दोन सुवर्ण व एक रौप्य पदकाची कमाई केली. शंभर मीटर्स फ्री स्टाईल शर्यतीत सोनेरी कामगिरी करताना त्याने ५२.९७ सेकंद अशी वेळ नोंदवली. त्याने या शर्यतीत सुरुवातीपासूनच साधारणपणे वीस ते पंचवीस मीटरची आघाडी घेतली होती. त्याला चारशे मीटर्स फ्री स्टाईल शर्यतीत मात्र सोनेरी यशाने हुलकावणी दिली. ही शर्यत त्याने चार मिनिटे ०९.६१ सेकंदात पार करीत रौप्य पदक पटकाविले. गुजरातच्या देवांश परमार याने हे अंतर चार मिनिटे ०३.९९ सेकंदात पूर्ण करीत सुवर्णपदक जिंकले.
मुलांच्या पन्नास मीटर्स बॅक स्ट्रोक शर्यतीत शुभंकर पत्की याने कांस्यपदक पटकाविले. पुण्याच्या या खेळाडूने हे अंतर २७.९६ सेकंदात पूर्ण केले. तो भूपेंद्र आचरेकर तसेच दुबई येथे प्रदीप कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे. या शर्यतीत महाराष्ट्राच्या ऋषभ दास याला चौथा क्रमांक मिळाला. शुभंकर याला शंभर मीटर्स बटरफ्लाय शर्यतीत पदकाने हुलकावणी दिली. त्याला या शर्यतीत चौथे स्थान मिळाले.
ऋषभ दास, अर्जुनवीर गुप्ता, शुभंकर पत्की व वेदांत माधवन यांचा समावेश असलेल्या महाराष्ट्राच्या संघाने चार बाय शंभर मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकले त्यावेळी त्यांनी हे अंतर तीन मिनिटे ५९.५७ सेकंदात पूर्ण केले. या शर्यतीत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी पहिल्यापासूनच आघाडी घेत शेवटपर्यंत टिकवली.
मुलींच्या पन्नास मीटर शर्यतीत महाराष्ट्राच्या भक्ती वाडकर हिने सुवर्णपदक जिंकताना ३१.१४ सेकंद वेळ नोंदविली तर तिचीच सहकारी प्रतीक्षा डांगी हिने हे अंतर ३१.४० सेकंदात पार करीत कांस्यपदक पटकाविले. या शर्यतीत महाराष्ट्राच्या ऋजुता राजाज्ञ हिला सहावे स्थान मिळाले. भक्ती ही मूळची कोल्हापूरची खेळाडू असून ती सध्या पुण्यातील क्रीडा प्रबोधिनी श्री. बालाजी केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे. ठाण्याची खेळाडू प्रतीक्षा ही वाशी येथील फादर ॲग्नेल अकादमीत प्रशिक्षण घेत आहे.
शंभर मीटर्स शर्यतीत महाराष्ट्राच्या पलक जोशी हिने रौप्य पदक पटकावले. तिने ही शर्यत एक मिनिट ०.३७ सेकंदात पार केली. पलक ही मुंबई येथील खेळाडू आहे. महाराष्ट्राच्या अनन्या नायक हिला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
जलतरणपटूंची कामगिरी अभिमानास्पद-महाजन
महाराष्ट्राच्या जलतरणपटूंनी आपले वर्चस्व कायम राखले त्यांची कामगिरी आमच्यासाठी खरोखरीच अभिमानास्पद आहे. त्यांच्या कामगिरीमुळे राज्यातील युवा खेळाडूंनाही प्रोत्साहन मिळेल असे महाराष्ट्राचे क्रीडामंत्री गिरिश महाजन यांनी सांगितले.
खेळाडू व प्रशिक्षकांच्या अथक प्रयत्नांचे हे फळ- डॉ. दिवसे
"आमच्या खेळाडूंनी खेलो इंडिया मध्ये जे काही यश मिळविले आहे, त्याचे बरेचसे श्रेय या खेळाडूंनी आणि त्यांच्या प्रशिक्षकांनी या स्पर्धेच्या तयारीसाठी जे अपार कष्ट घेतले आहेत. त्याचेच हे द्योतक आहे. या खेळाडूंच्या तयारीसाठी आमच्या क्रीडा संचालनालया मधील सर्व संबंधित अधिकारी व अन्य वर्गानेही मदत केली आहे, ते देखील कौतुकास पात्र आहेत", अशा शब्दात राज्याचे क्रीडा आयुक्त डॉक्टर सुहास दिवसे यांनी महाराष्ट्राच्या खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.