महाराष्ट्र महिला कबड्डी संघ सलग दुसऱ्यांदा रौप्य पदक विजेता
जबलपूर / विशेष प्रतिनिधी : युवा कर्णधार निकिता लंगोटे च्या कुशल नेतृत्वात महाराष्ट्र महिला कबड्डी संघाने गुरुवारी पाचव्या सत्रातील खेलो इंडिया युथ गेम्स मध्ये रौप्य पदकाचा बहुमान पटकावला. महाराष्ट्र संघाची सोनेरी यशासाठीची झुंज अवघ्या एका गुणाच्या पिछाडीने अपयशी ठरली. गत चॅम्पियन हरियाणा महिला संघाने ३०-२९ असा एका गुणाच्या आघाडीने अंतिम सामना जिंकला. त्यामुळे महाराष्ट्र महिला संघाला सलग दुसऱ्यांदा खेलो इंडिया मध्ये रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. हरियाणा महिला संघाला सलग दुसऱ्यांदा चॅम्पियन होण्याचा बहुमान मिळाला.
मुख्य प्रशिक्षक गीता साखरे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र संघाने महिला गटात सर्वोत्तम कामगिरी केली. त्यामुळे महाराष्ट्राला पदकावरचे आपले वर्चस्व कायम ठेवता आले.
संघातील युवा खेळाडू हरजीत, समृद्धी, यशिका, मनीषा यांची स्पर्धेतील कामगिरी लक्षवेधी ठरली.
खेळाडूंचे पदक कौतुकास्पद: प्रशिक्षक गीता साखरे
महाराष्ट्र महिला संघाने सोनेरी यश संपादन करण्यासाठी फायनल मध्ये शेवटच्या मिनिटापर्यंत झुंज दिली. मात्र अवघ्या एका गुणाच्या पिछाडीमुळे संघाला पराभवाला सामोरे जावे लागले. मात्र या दरम्यान खेळाडूंची कामगिरी कौतुकास्पद ठरली. त्यामुळे खेळाडूंनी महाराष्ट्राला रौप्य पदक जिंकून दिले, अशा शब्दात मुख्य प्रशिक्षक गीता साखरे यांनी संघावर कौतुकाचा वर्षाव केला.