डोंबिवली / शंकर जाधव : डोंबिवलीतील विद्यानिकेतन शाळेतील आरव गोळे याने दहाव्या वर्षी धरमतर ते गेटवे ऑफ इंडिया हा ३९ कि.मीचा सागरी पल्ला पार केला. मंगळवारची मध्यरात्र उलटून गेल्यावर दीडच्या सुमारास धरमतरच्या समुद्रात उडी मारलेल्या आरवचे पाय आठ तासांनी साडेनऊच्या सुमारास गेट वे ऑफ इंडियाच्या किनाऱ्याला लागले आणि गेल्या सहा महिने घेत असलेल्या परीश्रमांचं चीज झाल्याची भावना अद्वैत गोळे यांनी व्यक्त केली. गेले सहा महिने कल्याण डोंबिवली, नवी मुंबई व मुंबई परीसरातील विविध सागरी किनाऱ्यांवर रोज सहा सात तास ओपन सी स्विमिंगचा सराव करणाऱ्या आरवनं हा पराक्रम करत डोंबिवलीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
तिसऱ्या वर्षी पोहायला शिकलेल्या आरवनं स्विमिंगमधलं व्यावसायिक प्रशिक्षण घेण्यास पाचव्या वर्षी सुरुवात केली. सातव्या वर्षी विविध ठिकाणच्या पोहण्याच्या स्पर्धांमध्ये भाग घेण्यास सुरुवात केलेल्या आरवनं समुद्रामध्ये पोहण्याची तयारी मात्र सहा महिन्यांपूर्वीपासून सुरू केली. राजेश गावडे , मितेश पाटोळे आणि विशेष करून किशोर पाटील या अनुभवी प्रशिक्षकांच्या प्रशिक्षण आणि डोंबिवली जिमखान्याच्या दिलीप भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली आरव गोळेने यश मिळवले.