राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर
नवी दिल्ली: भगतसिंह कोश्यारी यांनी महापुरुषांबाबत
अनेक आक्षेपार्ह आणि वादग्रस्त विधाने केली होती. यामुळे विरोधी पक्षांनी राज्यपाल कोश्यारी यांच्या विरोधात आवाज उठवला होता. राज्यपालांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांनी केली होती. अखेर कोश्यारी यांचा राजीनामा राष्ट्रपतींकडून मंजूर करण्यात आला आहे. कोश्यारी यांच्या जागी झारखंडचे राज्यपाल रमेश बैस यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आल्याची माहिती राष्ट्रपती भवनाकडून देण्यात आली आहे. बैस हे महाराष्ट्राचे 20 वे राज्यपाल आहेत.
राष्ट्रपती भवनाकडून एकूण 13 नवीन राज्यपालांची नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी त्यांच्या विरोराधात राज्यात अनेक आंदोलने झाली. त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी होत होती. विरोधकांनी देखील त्यांच्या राजीनामा घेण्याची मागणी केली होती. राज्यात त्यांच्या विरोधात असलेल्या वातावरणामुळे त्यांनी देखील राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली होती. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांनी पत्र लिहिले होते.
अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल म्हणून लेफ्टनंट जनरल कैवल्य त्रिविक्रम पारनाईक, सिक्कीमचे राज्यपाल म्हणून लक्ष्मण प्रसाद आचार्य, झारखंडचे राज्यपाल म्हणून सीपी राधाकृष्णन, आसामचे राज्यपाल म्हणून गुलाबचंद कटारिया आणि हिमाचल प्रदेशचे राज्यपाल म्हणून शिव प्रताप शुक्ला यांची नियुक्ती करण्यात आली आहे.