पुणे : एमपीएससीने राज्यसेवा मुख्य परीक्षेचा नवा पॅटर्न 2025 पासून लागू करण्यात यावा, यासंदर्भात अनेक विद्यार्थी संघटनांकडून मागणी करण्यात येत होती. या मागणीला नंतरच्या काळात आंदोलनाचे स्वरुपही प्राप्त झाले होते. अखेर, या विद्यार्थ्यांच्या लढ्याला यश आले आहे. MPSC च्या मुख्य परीक्षांमध्ये नवा पॅटर्न 2025 पासूनच लागू होईल, असा निर्णय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतला आहे. MPSC ने गुरुवारी ट्विट करून या निर्णयाबाबत सर्वांना माहिती दिली.
राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या वर्णनात्मक स्वरूपाच्या परीक्षेसंदर्भातील उमेदवारांची मागणी, कायदा व सुव्यवस्थेची निर्माण झालेली परिस्थिती व उमेदवारांना तयारीसाठी द्यावयाचा अतिरिक्त कालावधी विचारात घेऊन सुधारित परीक्षा योजना व अभ्यासक्रम सन २०२५ पासून लागू करण्यात येत आहे. मागील काही दिवसांपासून विद्यार्थी आयोगाविरोधात आंदोलन करत होते. अखेर विद्यार्थ्यांच्या लढ्याला यश आलं आहे. विद्यार्थी आंदोलकांना राष्ट्रवादी काँग्रेसच प्रमुख शरद पवार यांनी भेट दिली होती. शरद पवार यांनी आंदोलक विद्यार्थ्यांना भेट दिल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आयोग, विद्यार्थी प्रतिनिधी यांचं बैठक घेण्याचं ठरलं होतं. ही बैठक आज नियोजित होती. मात्र बैठक न घेताच आयोगाने आज विद्यार्थ्यांच्या बाजूने निर्णय दिला.
एमपीएससीने निर्णय घेतल्यानंतर पुण्यात आंदोलक विद्यार्थ्यांनी जल्लोष केला आहे. मागील अनेक दिवसांपासून राज्यभरातील विद्यार्थी नवा अभ्यासक्रमातील बदल आता 2023 पासून नाही तर 2025 पासून लागू करा अशी मागणी करत होते.