बदलापूर : बदलापूर शहराच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासाच्या दिशेने एक ऐतिहासिक पाऊल टाकत भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) यांच्यात विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण युती करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही युती झाली असून, बदलापूर शहराला पायाभूत सुविधा, पाणी, वाहतूक आणि आरोग्य क्षेत्रात नवे रूप देण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला आहे. या युतीद्वारे नागरिकांच्या दैनंदिन अडचणींना प्राधान्य देत त्यांच्या समस्या शाश्वतरीत्या सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करण्यात येणार आहे. स्थानिक प्रशासनाचा कारभार पारदर्शक, कार्यक्षम आणि भ्रष्टाचारमुक्त व्हावा यासाठी दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी कठोर पावले उचलण्याचा निर्धार व्यक्त केला.
या युतीमुळे शहरात पाणीपुरवठा सुधारणा, रस्त्यांचे मजबुतीकरण, वाहतूक नियंत्रण, आरोग्य केंद्रांचा विस्तार आणि कचरा व्यवस्थापन यांसारख्या क्षेत्रांत ठोस सुधारणा अपेक्षित असल्याचे सांगण्यात आले. बदलापूर शहर महाराष्ट्रातील आदर्श आणि प्रगतिशील शहर म्हणून ओळखले जावे, हा या युतीमागचा प्रमुख हेतू असल्याचे नेत्यांनी नमूद केले.
या प्रसंगी परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे (मंत्री दर्जा) अध्यक्ष आशिष दामले, भारतीय जनता पक्षाचे मा. नगराध्यक्ष व गटनेते राजेंद्र घोरपडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रभाकर पाटील, भाजपा मंडळ अध्यक्ष (बदलापूर पूर्व) रमेश सोळशे, माजी नगरसेवक शरद तेली आणि राम लिये उपस्थित होते. यावेळी शहराच्या भविष्यासाठी दोन्ही पक्षांच्या एकात्मिक विकास आराखड्याची रूपरेषा सादर करण्यात आली.
कार्यक्रमात उपस्थित सर्व नेत्यांनी एकमुखाने सांगितले की, “राजकारणासाठी नव्हे, तर विकासासाठी ही युती आहे.” भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या या संयुक्त उपक्रमामुळे बदलापूर शहराच्या विकासाला नवसंजीवनी मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.