- डोंबिवलीतील कमानी जीवघेण्या ठरत आहेत का ?
- सुदैवाने जीवितहानी नाही
डोंबिवली / शंकर जाधव : डोंबिवलीत विविध ठिकाणी लावण्यात आलेल्या कमानी आता नागरिकांसाठी जीवघेण्या ठरत आहेत का असा प्रश्न निमार्ण झाले आहेत.ठाकुर्ली उड्डाणपूला जवळील कमान कोसळल्याची घटना सोमवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी यामुळे शहर विद्रूप करणाऱ्या कमानीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
शहरात वर्दळ असलेल्या ठिकाणी पालिकेची परवानगी असलेले व नसलेले भले मोठे बॅनर्स व कमानी उभ्या केल्या आहेत. अनेक दिवस झाले तरीही त्या कमानी जशाच्या तशा आहेत. या संदर्भात अनेक नागरिकांनी तक्रारी देखील नोंदवल्या मात्र महापालिका याकडे सपशेल दुर्लक्ष करत आहे. आज दुपारी डोंबिवली मध्ये अचानक धुळीचे वादळ आले होते. वादळाबरोबर प्रचंड वारा देखील वाहत होता. या वाऱ्याच्या वेगामुळे ठाकुर्ली उड्डाणपूला जवळ लावलेली एका मोठ्या विकासकाच्या जाहिरातीची कमान रस्त्यावर कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. या घटनेबाबत ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. दरम्यान या संदर्भात वारंवार पत्रव्यवहार करून देखील या कमानी वेळेवर काढल्या जात नसल्याचा आरोप ठाकरे गटाचे शहर प्रमुख विवेक खामकर यांनी केला. स्मार्ट सिटीचे कॅमेरे कमानीमुळे झाकले जात असल्याचेही खामकर यांनी यावेळी नमूद केले.
दरम्यान पालिका प्रशासनाने या घटनेचे गांभीर्य ओळखून त्यांना आणि वाहन चालकांना त्रास होणार नाही याची काळजी घेत योग्य त्या ठिकाणी कमानी व बॅनर लावावे अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
काही धुळीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे बॅनर काढावे असे निर्देश कर्मचाऱ्यांना दिले आहेत. तसेच कमानीवर लक्ष ठेवा असेही कर्मचाऱ्यांना सांगितले आहे, असे अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे यांनी सांगितले.