रिक्षाभाडेवरून प्रवाशाला दांडक्याने मारहाण


डोंबिवली / शंकर जाधव :  रिक्षाभाडे वाढ करणे आरटीओ विभागाची जबाबदारी असली तरी भाडेवाढ संदर्भात माहिती दिली नसल्याने रिक्षाचालक व प्रवासी यांच्यात खटके उडत असतात. रिक्षाभाडेवरून प्रवाशाला लाकडी दांडक्याने मारहाण केल्याची घटना सोमवारी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास डोंबिवली पूर्वेकडील इंदिरा चौकात घडली.मारहाण करणाऱ्या रिक्षाचालकाच्या विरोधात प्रवाशाने तक्रार दाखल केली आहे.

     मिळालेल्या माहितीनुसार, गणेश तांबे हे सोमवारी रात्री पावणे बारा वाजण्याच्या सुमारास पूर्वेकडील इंदिरा चौकात आले.तांबे यांना टाटा पावर येथे जाण्यासाठी  रिक्षाचालकाला भाडे विचारले.यात  तांबे आणि रिक्षाचालक यांच्यात वाद सुरू झाला.काही वेळाने रिक्षाचालकाने त्याच्या रिक्षातील लाकडी दांडक्याने तांबे यांना मारहाण करण्यास सुरुवात केली.या ठिकाणी उभे असलेल्या इतर रिक्षाचालकांनी मध्यस्थी घेत वाद मिटविण्याचा प्रयत्न केला.मात्र रिक्षाचालक ऐकण्याच्या मनस्थिती नव्हता.तांबे यांच्या पाठीवर लाकडी दांडक्याने मारतच होता.काही वेळाने रिक्षाचालक तेथून निघून गेला.तांबे यांनी पोलीस ठाण्यात रिक्षाचालकाविरोधात तक्रार दाखल केली.पोलीस रिक्षाचालकाचा शोध घेत आहे.

    दरम्यान, डोंबिवलीत रिक्षाचालकांची मुजोरी वाढली असताना आता प्रवाश्यांना मारण्यासाठी रिक्षाचालक रिक्षात लाकडी दांडके ठेवत असल्याचे यावरून दिसून येते.भाडे वाढ हा अनेक वर्षांपासून रखडला असून यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यास आरटीओला वेळ मिळत नसावा असे प्रवाश्यांचे म्हणणे आहे.


रिक्षाभाडे वाढीचे दरफलक डोंबिवलीत लागेना 

     उपप्रादेशिक परिवहन विभाग ( आरटीओ ) यांच्याकडून  शहरातील मुख्य ठिकाणी रिक्षाभाडे दरफलक लावणे आवश्यक असते.मात्र डोंबिवलीत आरटीओकडून दरफकल लावले नसल्याने रिक्षाचालकांची मुजोरी वाढत चालल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.वर्षातून एकदा आरटीओ अधिकारी डोंबिवलीत येऊन सर्व्हे करून निघून जातात.


वाहतूक पोलिसांची कारवाई थंडावली 

    भाडे वाढीची तक्रार आल्यावर रिक्षाचालकांवर दंडात्मक कारवाई केली जाते.मात्र वाहतूक पोलीस तक्रारीची वाट पाहतात.रिक्षामध्ये ओळखपत्र ठेवणे, रिक्षाचालकाने आवश्यक ते कागदपत्र जवळ ठेवणे, गणवेश परिधान करणे, जवळचे भाडे घेणे यावर वाहतूक पोलीस आणि आरटीओ विभागाकडून दंडात्मक कारवाईची आवश्यकता आहे.मात्र वाहतूक पोलिसांकडून कारवाई थंडवल्याने त्याचा त्रास नागरिकांना होत आहे.




Post a Comment

Previous Post Next Post