डोंबिवली / शंकर जाधव : डोंबिवली स्टेशन परिसर फेरीवाला मुक्त करा यासाठी मनसेचे १५ दिवसाची दिलेली डेडलाईन संपल्याने बुधवारी मनसे आमदार प्रमोद ( राजू ) पाटील यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी स्टेशन परिसराचा पाहणी दौरा केला. मात्र फेरीवाल्यांनी दौऱ्याची धास्ती घेतल्याने कधी नव्हे ते स्टेशन परिसर फेरीवाले मुक्त दिसला.यावेळी फेरीवाला संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार पाटील यांची भेट घेऊन प्रशासनाने नोंदणीकृत फेरीवाल्यांना बसण्यास जागा द्यावी अशी विनंती केली. यावेळी रिक्षाचालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आमदारांची भेट घेऊन स्टेशन परिसरात रिक्षा मीटरचा स्वतंत्र थांबा करण्याविषयी विनंती केली.
आमदार प्रमोद ( राजू ) पाटील यांच्यासह जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर, शहरअध्यक्ष मनोज घरत, प्रल्हाद म्हात्रे,राहुक कामत, माजी नगरसेविका कोमल पाटील, सुमेधा थत्ते, संदीप ( रमा ) म्हात्रे, प्रेम पाटील, श्रीकांत वारंगे यांसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी डोंबिवली स्टेशन परिसराची पाहणी केली.यावेळी पालिकेचे सहायक आयुक्त, वाहतूक पोलीस हेही उपस्थित होते.पाहणी दौरा सुरू असताना कष्टकरी हॉकर्स युनियनचे अध्यक्ष बबन कांबळे आणि फेरीवाल्यांनी आमदार पाटील यांची भेट घेतली.प्रशासनाने डोंबिवलीतील ९५०० नोंदणी फेरीवाल्यांना बसल्यास जागा देणे आवश्यक असताना प्रशासना मात्र आमच्यावर अन्याय करत आहे. तर दुसरीकडे आम्हाला कर्ज दिले जाते.आम्ही ते कर्ज कसे फेडणार असा प्रश्न उपस्थित केला.
यावर आमदार पाटील यांनी चार पाच दिवसात यांसदर्भात पालिका आयुक्तांबरोबर बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल.मात्र डोंबिवली स्टेशन परिसर फेरीवाला मुक्त झालाच पाहिजे. यावेळी रिक्षा युनियनचे अध्यक्ष कॉम्रेड काळू कोमास्कर, संजय देसले, दत्ता माळेकर , प्रमोद गुरव , जयनाथ यादव यांनी आमदार पाटील यांची भेट घेतली.फेरीवाल मुक्त स्टेशन परिसर झाल्यास दोन ठिकाणी रिक्षा मीटर थांबा होऊ शकतो असे सांगितले. यावर आमदार पाटील यांनी साकारतमक भूमिका घेत याबाबत लवकरच बैठक घेऊ असे आश्वासन दिले.