दिवा/ आरती मुळीक परब : छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक जयंती उत्सव मंच, दिवा शहर आणि पाटील बाबा प्रतिष्ठान यांच्या वतीने यावर्षी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. "सर्वधर्मसमभाव" हा संदेश गेले पाच ५ वर्ष दिवा शहर वासियांची वज्रमुठ बनलेला आहे. काल दिवा शहरामध्ये पुनः महासागर अवतरला. मंचातर्फे पहिल्यांदाच भीम जयंती साजरी झाली असून त्यावेळी दिव्यातील अनेक मान्यवरांनी येऊन दर्शन घेतले. त्यावेळी पाटील बाबा प्रतिष्ठाणच्यावतीने भव्य रोजगार मेळावा संपन्न झाला.
रोजगार मेळाव्यात महिलांसाठी ब्युटी पार्लर, टेलरिंग, नर्सिंग, गारमेंट अशा विविध कोर्सेसचे मोफत शिक्षण तसेच आय. टी. आय. ऑल ट्रेड, इंजिनियर, एम. कॉम, बी. एस. सी आय टी/ बी सी ए, आणि 10 वी 12 वीच्या अशा अनेक बेरोजगार व विद्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांच्या माध्यमातून महा रोजगार मेळाव्यात रोजगार उपलब्ध करुन देण्यात आला. त्यात लगेच 84 नागरिकांना नियुक्ती पत्रक देत काल त्यांना कायमस्वरुपी रोजगार मिळाला आहे. त्यावेळी अनेकांना सन्मानचिन्ह व गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच काल डॉ. आंबेडकरांच्या मिरवणुकीत सहभागी झालेल्या लहान मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. त्याप्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावरील व्याख्यान प्रसिध्द व्याख्याते शांताराम आग्रे (माजी प्रशासकीय अधिकारी) आणि प्रा. अफिक दफेदार (शिवव्याख्याता, अध्यक्ष शिवफुले शाहू आंबेडकरांचे विचार- प्रचारक) यांचे प्रवचन आयोजित केले होते.
ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करण्यात आला. त्यानंतर सहा ते नऊ लहान मुलांचे कार्यक्रम पार पडले. तर रात्री ९ वाजता जेवण करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक जयंती उत्सव मंच, दिवा शहर, कुणबी रहिवासी समाज, खेड तालुका कोकण रहिवासी आणि पाटील बाबा प्रतिष्ठानच्या वैष्णव नवनीत यांचे या जयंतीला विशेष सहकार्य लाभले.

