एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा
ऐन उन्हाळ्यात ठाणेकरांपुढे पाणी टंचाईचे संकट
ठाणे : ठाणे शहरास पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी मुंबई-नाशिक महामार्गालगत माणकोली पेट्रोलपंपाजवळ सोमवारी पहाटे ५ वाजता फुटली. त्यामुळे शहराचा पाणी पुरवठा बंद झाला आहे.
ठाणे महापालिकेच्या स्वतःच्या योजनेतून आणि स्टेम प्राधिकरणाकडून ठाणे शहराला होणारा पाणी पुरवठा बंद करून दुरुतीचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामामुळे शहराला पुढील २४ तासांहून अधिक काळ पाणीपुरवठा होऊ शकणार नसून त्याचबरोबर पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात ठाणेकरांपुढे पाणी टंचाईचे संकट उभे राहीले आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रात चार स्रोतांमार्फत दररोज ५८५ दशलक्षलीटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो. त्यात महापालिकेच्या स्वत:च्या योजनेतून २५० दशलक्षलीटर, स्टेम प्राधिकरणाकडून ११५ दशलक्षलीटर, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून १३५ दशलक्षलीटर आणि मुंबई महापालिकेकडून ८५ दशलक्षलीटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो. त्यामुळे हे सर्वच स्रोत शहरातील पाणी पुरवठ्याच्या दृष्टीकोनातून महत्वाचे मानले जातात.
