कल्पनेपेक्षाही चांगला पुतळा बनवण्यात आला : मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव
तेलंगणा : भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ जयंतीच्या निमित्ताने हैदराबादमध्ये भव्य पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ फूट उंच पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. १२५ फूट उंच पुतळा उभारण्यात आला आहे, जो ५० फुट उंचीच्या चबुतऱ्यावर उभा आहे. या सोहळ्याला वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे उपस्थित होते.
११.४ एकर जागेवर हे स्मारक निर्माण केले गेले आहे, ज्यामध्ये एक भव्य पुतळा, पायाभूत इमारत, संग्रहालय, ग्रंथालय, कॉन्फरन्स हॉल आणि इतर संरचना आहेत. संपूर्ण स्मारकासाठी सुमारे १४६.५ कोटी रुपये लागले. २०१७ मध्ये, तेलंगणा सरकारने राज्यघटनेच्या शिल्पकाराचा १२५ फूट उंचीचा भव्य पुतळा राज्यात बसवण्याचा निर्णय घेतला होता.
तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्याचे कौतुक केले. कल्पनेपेक्षाही चांगला पुतळा बनवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, या देशाच्या येणाऱ्या पिढ्यांसाठी संविधानाचा कर्ता म्हणून तसेच सामाजिक न्यायासाठी लढणारा योद्धा म्हणून त्यांचे परिश्रम आणि बलिदान चिरंतन आहे. केवळ दलित, आदिवासी, बहुजनच नव्हे, तर भारतात जिथे-जिथे नागरिकांना भेदभावाचा सामना करावा लागला तिथे डॉ. बाबासाहेबांची महत्त्वाकांक्षा खरी ठरली. त्यांच्यासाठी आपण जे काही करू ते कमीच असून राज्य सचिवालयाशेजारी बुद्ध पुतळ्यासमोर आणि तेलंगणा हुतात्मा स्मारकाशेजारी असलेला आंबेडकरांचा भारतातील सर्वात उंच पुतळा लोकांना आणि संपूर्ण राज्य प्रशासनाला दररोज प्रेरणा देईल, असे मुख्यमंत्री केसीआर यांनी सांगितले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १२५ फूट उंच पुतळ्याच्या अनावरणासाठी भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पुतळ्याच्या अनावरणासाठी क्रेनच्या साहाय्याने मोठा पडदा हटवण्यात आला. मोठ्या संख्येने बौद्ध भिक्खू या कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी विविध संगीत आणि भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ही सर्वात उंच मूर्ती असल्याचे म्हटले जात आहे. डॉ. आंबेडकरांचा हा पुतळा एकूण १७५ फूट उंचीचा आहे, ज्यात भारतीय संसदेच्या इमारतीप्रमाणे दिसणारा ५० फूट उंच गोलाकार आधार आहे. या पुतळ्याचं वजन ४७४ टन आहे. या पुतळ्यासाठी ३६० टन स्टेनलेस स्टीलचा वापर करण्यात आला आहे. तर संपूर्ण पुतळ्यासाठी ११४ टन कांस्य वापण्यात आले आहे. आंबेडकरांचा हा पुतळा केपीसी प्रोजेक्ट्स लिमिटेडला देण्यात आला होता. या पुतळ्याच्या निर्मितीसाठी मागील ३ जून २०२१ रोजी केपीसीसह करार करण्यात आला होता. या पुतळ्यासाठी एकूण १४६.५० कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. संपूर्ण पुतळा २६,२५८ चौरस फूट क्षेत्रफळावर उभारण्यात आला आहे. या पुतळ्याच्या पायथ्याची उंची ५० फूट आहे. या पुतळ्याची रचना तीन मजली करण्यात आली आहे.
या पुतळ्याच्या संरचनेत एक संग्रहायलय असणार आहे. या संग्रहालयात आंबेडकरांचं जीवन, त्यांचा इतिहास दर्शवणार अनेक लेख तसंच अनेक फोटो असणार आहेत. तसंच आंबेडकरांच्या जीवनावरील ऑडिओ-व्हिज्युअल सादरीकरण करण्यासाठी १०० सीट असलेलं सभागृह असणार आहे. तसंच काही वाचनालयंही बांधली जाणार आहेत. एकूण ११ एकरात पसरलेल्या या परिसरात २.९३ एकरमध्ये सजावट करण्यात येणार आहे. तसंच या परिसरात ४५० कारसाठी पार्किंगची सुविधा असणार आहे. आंबेडकरांच्या पुतळ्याच्या पायापर्यंत पोहोचण्यासाठी लिफ्टची सुविधा करण्यात आली आहे.
डॉ. आंबेडकरांचा हा पुतळा प्रसिद्ध मूर्तीकारांपैकी एक असलेले ९८ वर्षीय राम वनजी सुतार आणि त्यांचा ६५ वर्षीय मुलगा अनिल राम सुतार यांनी उत्तर प्रदेशातील नोएडामध्ये राम सुतार आर्ट क्रिएशनने डिझाइन केला आहे. राम वनजी सुतार आणि त्यांच मुलगा अनिल राम सुतार यांनी याआधी जगातील गुजरातमधील सर्वात उंच पुतळा सरदार वल्लभभाई पटेल यांचा स्टेच्यू ऑफ यूनिटी तयार केला होता. त्यांनी हा स्टेच्यू ऑफ यूनिटीची उंची ५९७ फूट आहे. या पुतळ्यासह त्यांनी अनेक स्मारकं, पुतळे तयार केले आहेत.
Tag : हैदराबाद 125 फुटी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा, तेलंगणा मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव

