एक हजार गिरणी कामगारांना मिळणार जुलैमध्ये घरे

 


 उर्वरित गिरणी कामगारांना घरे देण्यास सरकार कटिबद्ध - संनियंत्रण समिती अध्यक्ष सुनिल राणे

मुंबई,  : म्हाडाकडे १ लाख ७४ हजार गिरणी कामगारांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी १५ हजार ८७० कामगारांच्या घरांची सोडत काढण्यात आली असून सद्यस्थिती म्हाडाने ९ हजार ६३१ गिरणी कामगारांना हक्काचे घर दिले आहे. उर्वरित १ लाख ५८ हजार गिरणी कामगारांना घरे देण्यास सरकार कटिबद्ध असल्याची माहिती गिरणी कामगार संनियंत्रण समितीचे अध्यक्ष आमदार सुनील राणे यांनी दिली. 

    गिरणी कामगार संनियंत्रण समितीची बैठक म्हाडा भवनात पार पडली. या बैठकीत गिरणी कामगारांना देण्यात येणाऱ्या घरांबाबत चर्चा करण्यात आली. या मध्ये गिरणी कामगारांची पात्रता निश्चिती, पात्र लाभार्थ्यांना घरांचा ताबा देणे, नवीन घरांची निर्मिती करणे, एमएमआरडीए च्या २ हजार ५२१ घरांची सोडत काढण्याबाबत चर्चा झाली. तसेच २०१७ च्या सोडतीमधील पनवेल कोण येथील ४०८ घरे घरांची ताबा देण्याची प्रकिया पूर्ण झाली असून त्यांना घराचा ताबा देण्यासाठी येथील घरांची दुरुस्ती कामे १४ जून पासून सुरु होणार आहेत. ही कामे तातडीने मार्गी लावून घराचा ताबा देणार, असल्याची माहिती राणे यांनी दिली.

                तसेच उर्वरित कामगारांची पात्रता निश्चिती १५ जून पर्यंत करण्यात येणार असून अंदाजे सात हजार गिरणी कामगारांना घरे वाटप करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे. त्याचप्रमाणे २०२० साली काढण्यात आलेल्या श्रीनिवास आणि बॉम्बचे डाईंग मिलच्या ३८९४ घरांचा ताबा लवकरच देण्यात येणार आहे. तसेच ठाणे येथील रायचुर २२६३ घरे आणि कोल्हे पनवेल येथील २५८ घरे एकूण २५२१ घरांची सोडत लवकरच काढण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या असल्याची माहिती राणे यांनी दिली.


दलाल दाखवा रोख पाच हजार बक्षिस मिळवा 

  गिरणी कामगारांच्या सोडतीत दलालांचा हस्तक्षेप असल्याचा आरोप होत असताना म्हाडा कार्यालयातील गिरणी कामगार विभागात जर दलाल दिसले तर त्यांची माहिती मला द्यावी. माहिती देणाऱ्याला ५ हजार बक्षीस देण्यात येईल तसेच दलालांना सरळ पोलिसांच्या हवाली केली जाईल, असे यावेळी सुनील राणे यांनी माहिती दिली. तसेच मंगळवार व गुरुवार या दिनी म्हाडा कार्यालयात येऊन गिरणी कामगारांशी संपर्क साधणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post