पालिका आयुक्तांनी डोंबिवलीत लक्ष द्यावे
डोंबिवलीकर प्रशासनावर नाराज
डोंबिवली : डोंबिवली शहर, एमआयडीसी व निवासी भगत यावर्षीही सर्व नाले, गटारे यांची सफाई झाली नसल्याने तसेच रस्ते काँक्रीटीकरणामुळे रस्त्यांची उंची वाढल्याने पावसाळ्यात पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जून महिना संपत आला तरी नाले-गटारे यांची साफसफाई झाली नसल्याने डोंबिवलीकर प्रशासनवर नाराज झाले आहेत. त्यामुळे पालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी डोंबिवलीकडे लक्ष द्यावे आणि संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना जाब विचारावानअशी मागणी होत आहे.
मनसे आमदार राजू पाटील आणि भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी नालेसफाईबाबत अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले होते. एमआयडीसी निवासी आणि औद्योगिक भागातील काही मोठे नाल्यांची सफाई अद्याप झाली नाही. काही मोठे नाले यातील वरवरचा कचरा काढून दिखाऊ नाले सफाई केली आहे. डीएनएसबी बँक मुख्यशाखा ते अभिनव विद्यालयकडे जाणारा नाला, एमआयडीसी सर्व्हिस रोड/कल्याण शिळ रोड मधून जाणारा नाला, उस्मा पेट्रोल पंप जवळून जाणारा नाला असे अनेक औद्योगिक आणि निवासी भागातील नाले यांची साफसफाई झाली नाही. एमआयडीसी निवासी मधील मध्यवर्ती असा कावेरी नाल्यांची साफसफाई करण्यात आल्याचे दाखविण्याा आले असले तरी आजही परिस्थिती वेगळी आहे.
एमआयडीसी मधील छोटी गटारे ही एमआयडीसी कडून साफ करण्यात येतात. मागील वर्षी काही गटारे नवीन बनविण्यात आली होती. सदर गटारे काही ठिकाणी तुटलेली, बुजलेली आहेत. मिलापनगर, सुदर्शननगर, सुदामानगर, चैतन्यनगर या निवासी मधील भागात या पावसाळी गटारांचे पाणी वाहून जाताना अनेक मोठ्या समस्या निर्माण होणार असे स्थानिक नागरिक राजू नलावडे सांगतात.
मनसे आमदार प्रमोद ( राजू ) पाटील यांनी मे महिन्यात नाल्यांची पाहणी केली होती. त्यावेळी केडीएमसी आणि एमआयडीसी अधिकाऱ्यांना आमदारांनी जाब विचारला होता. तेव्हा उपस्थित अधिकाऱ्यांनी नाले सफाईची कामे मे महिना अखेरपर्यंत पूर्ण होतील अशी आश्वासने दिले होते.
ठेकेदाराची सखोल चौकशीची मागणी
करोडो रुपये खर्च करून महानगरपालिका हद्दीतील नाले, गटारे साफसफाईची केल्याचा दिखावा करण्यात आला. पावसाळ्यापूर्वी नालेसफाई न होणे ही डोंबिवलीकरांची फसवणूक असून पालिका आयुक्तांनी याबाबत अधिकाऱ्यांना जाब विचारणे आवश्यक आहे. यासंदर्भात ठेकेदारांची सखोल चौकशी झाली पाहीजे अशी मागणी नागरिक करत आहेत.
गणपत गायकवाड यांनीही अधिकाऱ्यांना झापल
ही नालेसफाई नव्हे तर पालिकेच्या तिजोरीची सफाई अश्या शब्दात कल्याण पूर्व विधानसभा मतदार संघाचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी पालिका अधिकाऱ्यांना झापले होते.मात्र त्यानंतरही प्रशासनाने नालेसफाईबाबत गांभीर्य दाखविले नाही हे दिसून आले.