डोंबिवली/ शंकर जाधव : कल्याण – डोंबिवली महानगरपालिका हद्दीत पाणी प्रश्नाने नागरीक वैतागले आहेत.पाणी समस्या सुटत नसल्याने नागरिकांना हंडा –कळशी घेवून पालिकेवर मोर्चा काढण्याची वेळ येते. मंजूर कोट्यातील पाणीही नागरिकांना मिळत नाही. अशा वेळी नागरिकांना महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ डोंबिवली कार्यालय आणि कल्याण येथील पालिका मुख्यालयात हेलपाटे मारावे लागतात. पाणी टॅकरवर हजारो रुपये खर्च करून थकलेल्या लोकांचा हा प्रश्न कधी सुटेल असा प्रश्न उपस्थित होत आहे. पाणी प्रश्न निकाली लावण्यासाठी आता मनसे आमदार प्रमोद ( राजू ) पाटील हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत.
कल्याण ग्रामीण भागातील दावडी येथील रिजन्सी अनंतम मधील नागरिकांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. एमआयडीसीकडे वारंवार पाठपुरावा करून देखील मंजूर कोटा मिळत नसल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यामुळे रविवारी मनसे आमदार राजू पाटील यांनी रिजन्सी अनंतम मधील नागरिकांची भेट घेतली. या संदर्भात मनसे आमदार राजू पाटील यांनी येथील नागरिकासह एमआयडीसी कार्यालयात कार्यकारी अभियंता आव्हाड यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी पालिकेचे अधिकारी वर्गही उपस्थित होते. यावेळी उपस्थित नागरिकांनी पाणी का मिळत नाही असा प्रश्न कार्यकारी अभियंता आव्हाड यांना विचारला. तर आमदार पाटील म्हणाले, अमृत योजनेचा १४० एमएलडी मंजूर कोटा देणे आवश्यक आहे. केडीएमसीचे हक्काचे १४० एमएलडी पाणी पुरवठा नवी मुंबईला दिला जातो. आता नवी मुंबईला पाणी मिळावे म्हणून त्यांचे धरण झाले आहे. म्हणून ते पाणी कोटा परत घ्यावा. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा कोटा देणार असल्याचे आश्वासन दिले होते. याची आठवण करून देण्यासाठी फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे पत्रकारांना सांगितले.
एमआयडीसीकडून पुन्हा आश्वासन
रिजन्सी अनंतममध्ये साडे चार हजार सदनिका आहेत. या सदनिकांना पुरसे पाणी मिळत नाही. आमचे महिनाभर हाल सुरु आहेत. पाणी टॅकरबाबत तर काही न बोललेच बरे. आवश्यक दाबाने पाणी पुरवठा का होत नाही हे विकासला विचारले तर ते एमआयडीकडे बोट दाखविता. एमआयडीकडे विचारणा केली तर ते आश्वासन देतात असे सदनिकाधारकांचे म्हणणे आहे.
