डोंबिवलीत पावसाची जोरदार बॅटींग

 

मानपाडा पोलीस ठाण्यात गुडघाभर पाणी , 

स्टेशनपरिसरात पाणीच पाणी, दुकानात पाणी 

डोंबिवली ( शंकर जाधव ) पंधरा दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पावसाने डोंबिवली शहरात मंगळवारपासून जोर धरला. पावसाने रौद्ररूप धारण केल्यामुळे शहरात सखल भागात पाणी तुंबले. मोठे नाले आणि गटारे यांची पूर्णतः साफसफाई न झाल्यामुळे काही ठिकाणी चाळीत, गल्लीत पाणी तुंबले. अग्निशमन कार्यालयात झाडे पडल्याच्या तसेच पाणी तुंबल्याचे पालिकेच्या आपत्कालीन कक्षाला कळविण्यात आले होते.मानपाडा पोलीस ठाण्यातही पाणी शिरल्याने पोलिसांची तारांबळ उडाली.

पूर्वेकडील इंदिरा चौक आणि स्टेशनपरिसरात पाणी तुंबल्याने रिक्षा चालकांना, पादचाऱ्यांना तुंबलेल्या पाण्यातून मार्ग काढावा लागला. दुकानदारांना पाणी तुंबल्याने थोड्या प्रमाणात त्रास झाला. काही प्रमाणात सामानाची नासाडी झाल्याचेही दुकानदारांनी सांगितले. रस्त्याशेजारील नाल्यांची साफसफाई योग्य प्रकारे झाली नाही त्यामुळे पाणी तुंबले असे दुकानदार सांगतात. औद्योगिक विभाग मिलापनगर येथे पावसामुळे पाणी तुंबलेले होते. तेथील सिमेंट काँक्रीटीकरण रस्त्यांची उंची वाढविल्यामुळे यावर्षी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी तुंबणार असल्याचे नागरिक सांगत होते त्याची प्रचितीही बुधवारी दिसून असल्याचे मिलापनगर मधील लोक सांगत आहेत. पालिका प्रशासनाने गटारांची साफसफाई झाली आहे असे जरी सांगत असले तरी वस्तुस्थिती मात्र वेगळी असल्याचे सोशल मिडियावरील व्हायरल माहितीने स्पष्ट होत आहे.



शहरात पावसामुळे झाडे पडल्याच्या तक्रारीनुसार मिलापनागर येथे दोन, खंबालपाडा येथे दोन, नंदिवली येथे एक, गोपाळनगर येथे एक, जुनी डोंबिवली गावात एक अशी झाले पडल्याच्या नोंदी अग्निशमन कार्यालयात होत्या. मानपाडा पोलीस ठाण्यातही पाणी तुंबल्याने पोलिसांचे अतिशय हाल झाले.

बारवी धरणात पाऊस :

बारवी धरण परिसरात पाऊस पडल्याने आता धरणातील पाण्याची पातळी बुधवारी सकाळी 58.98 मीटर झाली तर थेट संचयन 88.51mcm असून धरणात पाण्याचा % 26.12 टक्के पाणी असल्याची माहिती मिळत आहे. धरण क्षेत्रात मंगळवारी पाऊस 48.00 मि.मी पडला असून धरण क्षेत्रात आता एकूण पाऊस 209.00 मिमी झाला आहे. बारवी धरणात पाऊस पडण्यापुर्वी शुक्रवार दि. 23 जून रोजी पाण्याची पातळी 58.95 मीटर होती. थेट संचयन 88.17 mcm तर धरणात पाण्याचा साठा 26.02 टक्के होता. दरम्यान एकूण पाऊस 7.00 मिमी होता.



Post a Comment

Previous Post Next Post