बिगारी कामगार चांगीबाई राठोडांच्या मुलाला ६० हजार रुपये शैक्षणिक शिष्यवृत्ती

 


       महाराष्ट्र जनरल मजदूर संघटनचे प्रयत्न 

डोंबिवली / शंकर जाधव : गेली अनेक वर्ष डोंबिवली पूर्व येथील गार्डन नाका येथे बिगारी काम करणाऱ्या चांगीबाई राठोड या महिलेच्या मुलाला अभियांत्रिकी शिक्षणासाठी शासनाची ६० हजार शिष्यवृत्ती मिळाली.महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी महामंडळाच्या अनेक हितावह योजना कामगारांसाठी शासनाच्या माध्यमातून जाहीर करण्यात येतात. महाराष्ट्र जनरल मजदूर संघटना (रजि.) डोंबिवली संस्थेने प्रयत्नाने डोंबिवलीत नाका कामगार महिलेच्या मुलाला अभियांत्रिकी विद्याभ्याससाठी शासन योजनेतून शिष्यवृत्ती मिळवून देण्यात आल्याचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण मिसळ यांनी या दरम्यान सांगितले.

   याबाबत महाराष्ट्र जनरल मजदूर संघटना (रजि.) डोंबिवली संस्थापक अध्यक्ष मिसाळ म्हणाले, महाराष्ट्र जनरल मजदूर संघटनेचा वर्धापन दिन प्रतिवर्षाप्रमाणे येत्या २५ जून रोजी मोठ्या धुमधडाक्यात करण्याचे निश्चित झाले आहे. यावेळी १० वी ते १५ वी पर्यंतच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार, महिलांसाठी हळदीकुंकू, सार्वजनिक हरिपाठ, महिलांसाठी लकी ड्रा १५ पैठणी साडी सोन्याच्या नथ आदी विशेष आकर्षणे या निमित्ताने मजदूर संघटनेच्या माध्यमातून असणार आहेत.

   इमारत व इतर बांधकाम कामगार क्षेत्रातील महिला व पुरुष सदस्यांसाठी ही संघटना शासनाच्या अनेक योजनांसाठी पाठपुरावा करीत असते. नोंदणीकृत कामगारांच्या महिलांच्या प्रसूतीसाठी शासनाकडून १५ ते २० हजार अशी मदत मिळेल. ती मदतही संस्था मिळवून देते. काम करतांना कामगाराचा मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत मिळते त्याबाबतीतही संघटना जागरूक राहून मदत मिळवून देते. जरी काही कारणाने काम करतांना अपंगत्व आले तर त्यासाठीही शासनाची योजना आहेत त्याचा लाभही आमच्या सदस्यांना आम्ही मिळवून देतो. 

यावर्षी आमच्या पाठपुराव्याला यश आले आहे. गेली २०- २५ वर्षे डोंबिवली पूर्व येथील गार्डन नाका येथे बिगारी काम करणाऱ्या चांगीबाई राठोड या महिलेच्या मुलाला अभियांत्रिकी शिक्षणासाठी शासनाची शिष्यवृत्ती मिळाली तो आमच्यासाठी आनंदाचा क्षण होता. दोन दिवसांपूर्वी संस्थेच्या प्रयत्नाने त्या विद्यार्थ्याला पैसे मिळाले असेही मिसळ यांनी या दरम्यान सांगितले. कामगारांना योजनांची माहिती तसेच त्या फायदा मिळवून देण्यासाठी संस्था सदैव प्रयत्नशील असते. यासाठी युवा अध्यक्ष नामदेव भानुसे, खजिनदार विश्वनाथ रेवगडे आणि आदी पदाधिकारी कामगारांसाठी विशेष मेहनत घेत आहेत.





Post a Comment

Previous Post Next Post