महापालिका शहर अभियंता अर्जुन अहिरे
डोंबिवली ( शंकर जाधव ) खड्ड्यांमुळे दुर्घटना घडल्यास संबंधित अभियंता आणि कंत्राटदाराला जबाबदार ठरविणार असल्याची माहिती कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे शहर अभियंता अर्जुन अहिरे यांनी दिली. गेल्या दोन दिवसांपासून कल्याण -डोंबिवली परिक्षेत्रात पडत असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर कल्याण- डोंबिवली रस्त्यांची पाहणी केली.
कल्याण- डोंबिवली महानगरपालिकेचे शहर अभियंता अहिरे यांनी रस्त्यावरील खड्डे तातडीने भरण्याचे निर्देश संबंधीत अधिका-यांना दिले. मुसळधार पर्जन्यवृष्टीमुळे कल्याण- डोंबिवलीतील रस्त्यांवर खड्डे पडले असून सदर खड्डे भरण्याचे काम सुरू असून पावसामुळे काहीशी अडचण येत असली तरीही हे काम अव्याहतपणे सुरू राहणार आहे. क्विक सेटिंग सिमेंटच्या माध्यमातून हे खड्डे भरण्याच्या सूचनाही शहर अभियंता अहिरे यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या. खड्डे भरण्याचे काम रात्री करण्याच्या तसेच संबंधित जबाबदार अभियंत्याने दररोज रस्त्यांवर प्रत्यक्ष पाहणी करण्याच्या सूचनाही अर्जुन अहिरे यांनी यावेळी अधिकाऱ्यांना केल्या.
शहर अभियंता अर्जुन अहिरे यांनी यावेळी दुर्गाडी किल्ला परिसर, पत्रीपुल, गोविंदवाडी, उंबर्डे, सहजानंद चौक, म्हसोबा चौक ठाकुर्ली, डोंबिवली पूर्व स्टेशन परिसर, लोकमान्य टिळक चौक आदी परिसरातील रस्त्यांची आणि खड्डे भरण्याच्या कामाची पाहणी केली.