भांडूप : सौर उर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र शासनाने अनेक पाऊले उचलली आहेत. सोलर रुफटॉप योजना ही अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना असून या योजने अंतर्गत महावितरणच्या ग्राहकांना छतावरील (रुफटॉप) सौर ऊर्जा निर्मिती यंत्रणा बसविण्यासाठी केंद्र शासनाकडून ४० टक्क्यांपर्यंत अनुदान मिळत आहे. सौर ऊर्जा निर्मिती यंत्रणेमुळे मासिक घरगुती वीजबिलात मोठी बचत होऊन, नेटमिटरिंगद्वारे महावितरणकडून वर्षाअखेर शिल्लक वीज देखील विकत घेतली जाते. अनेक ग्राहकांनी या योजनेचा लाभ घेतले आहे. ग्राहकांच्या सोयीसाठी केंद्र शासनाने ‘नेशनल पोर्टल फॉर सोलर रुफटॉप’ चे अनावरण जुलै २०२२ मध्ये केले असून या पोर्टलवर ग्राहक भारतामधून कुठूनही सोलर रुफटॉपसाठी अर्ज करू शकतात.
सदर योजना ग्राहकांसाठी फायद्याची असून या योजनेमुळे रोहित्र वरचा ताण कमी होतो. या योजनेमधून घरगुती वर्गवारीतील ग्राहकांना किमान एक किलोवॅट क्षमतेची छतावरील (रुफटॉप) सौर ऊर्जा निर्मिती यंत्रणा बसविण्यासाठी केंद्र शासनाकडून वित्त सहाय्य देण्यात येत आहे. रुफटॉप सौर योजनेमधून घरगुती ग्राहकांसाठी अटी व शर्तीसह १ ते ३ किलोवॅटपर्यंत ४० टक्के आणि ३ किलोवॅटपेक्षा अधिक ते १० किलोवॅटपर्यंत २० टक्के अनुदान देण्यात येते. तसेच सामुहिक वापरासाठी ५०० किलोवॅटपर्यंत परंतु प्रत्येक घरासाठी १० किलोवॅट मर्यादेसह गृहनिर्माण रहिवासी संस्था (Group Housing Society) व निवासी कल्याणकारी संघटना (Residential Welfare Association) ग्राहकांना २० टक्के अनुदान देण्यात येते.
महावितरणच्या भांडूप परिमंडल अंतर्गत २६२५ सोलर रुफटॉप वापरणारे ग्राहक असून १०० ग्राहकांनी या योजनेचा लाभ घेऊन अनुदान मिळविले आहे. तसेच, ५० ग्राहकांनी नेशनल पोर्टल द्वारे अर्ज करून या योजनेचा लाभ घेतला आहे. याशिवाय, २४०९ ग्राहक विना अनुदानित सोलर रुफटॉपचा वापर करून आपल्या वीजबिलात बचत करीत आहेत.महावितरण रुफटॉप सौर ऊर्जा निर्मिती यंत्रणा आस्थापित करण्यासाठी ऑनलाईन अर्जाची सोय महावितरणच्या www.mahadiscom.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या यंत्रणेला लावण्यात आलेल्या नेटमिटरिंगद्वारे वर्षाअखेर शिल्लक वीज प्रति युनिट दराप्रमाणे महावितरणकडून विकत घेतली जाईल. त्याचाही आर्थिक फायदा संबंधीत घरगुती ग्राहकांना होणार आहे. सोबतच सौर यंत्रणा उभारणीच्या खर्चाची साधारणतः ३ ते ५ वर्षात परतफेड होणार आहे.
“सोलर रुफटॉप योजना ग्राहकांसाठी फायद्याची असून दरमहा वीजबिलात आर्थिक बचत ही करता येते. तसेच पर्यावरणस्नेही ग्राहक म्हणून कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी या योजनेचा लाभ घेऊन घरगुती ग्राहक पर्यावरण रक्षणात सहभागी होऊ शकतात”, असे आवाहन महावितरण भांडूप परिमंडलाचे मुख्य अभियंता सुनील काकडे यांनी केले आहे.