कल्याणमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर ज्ञान केंद्राचे आज लोकार्पण

Maharashtra WebNews
0

कल्याण \ शंकर जाधव:  भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनाच्या पूर्व संध्येला कल्याण पूर्वेतील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर ज्ञान केंद्राचे लोकार्पण करण्यात येणार आहे. हे लोकार्पण महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते तसेच उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांच्या विशेष उपस्थितीत आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या विशेष प्रयत्नातून साकारलेल्या " भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्ञान केंद्राचा" लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे.

सदर इमारत सुमारे १३९७.९१  चौ मी क्षेत्रफळाच्या भूखंडावर उभारण्यात आलेली आहे. यामध्ये ज्ञान केंद्राची इमारत L टाईप आकाराची असून तिचे क्षेत्रफळ५३९.९१ चौ. मी. इतके आहे. या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर सुमारे आठ फूट उंचीचा सुशोभित चौथरा बांधून त्यावर १२ फूट उंचीचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य  पुतळा उभारण्यात आलेला आहे.

सदर ज्ञान केंद्राच्या इमारतीत असलेल्या विविध हॉल्समध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे समग्र चरित्र दर्शविणारी, विविध माध्यमातील साधने बसविण्यात आली आहेत यामध्ये त्यांचे बालपण, त्यांचे शिक्षण त्यांनी केलेले सत्याग्रह ,त्यांची राजकीय कारकीर्द, या संदर्भात विविध पॅनल आणि बॅकलिट पॅनलद्वारे माहिती दिली जाईल. त्याचप्रमाणे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विषयक फिल्मचे प्रसारण प्रोजेक्टरच्या माध्यमातून दाखविण्यात येईल, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाजासाठी केलेल्या कामाचा लेखा-जोखा प्रोजेक्टर आणि पॅनलच्या माध्यमातून फ्लिपबुक टेक्नॉलॉजीद्वारे दाखविण्यात येईल.  डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली पुस्तके, त्यांनी भुषविलेली खाती, भारतीय संविधान इ. माहिती पॅनल्स, ३D फॅन होलोग्राफी आणि बॅकलिट पॅनलद्वारे दाखविण्यात येणार आहे.  डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्माणदिन आणि त्यांना प्रदान करण्यात आलेल्या भारतरत्न पुरस्कारांसंबंधी माहिती देखील येथे दाखविली जाणार आहे.

इतकेच नव्हे तर होलोग्राफी शो च्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर नागरिकांना संदेश देत असल्याचा अविस्मरणीय अनुभव नागरिकांना घेता येईल. नागरिकांच्या वाचनासाठी सुमारे १२०० पुस्तके आणि ई-बुक्स या ठिकाणी उपलब्ध राहणार आहेत. सदर ज्ञान केंद्र हे नागरिकांसाठी अभ्यासपूर्ण माहिती स्थळ  व महापालिकेच्या अभिमानात भर टाकणारी वास्तू म्हणून नावाजली जाईल.




Post a Comment

0Comments

Post a Comment (0)