गडकरी रंगायतन नाट्यगृहाचे नूतनीकरण होणार

 राज्य सरकारच्यावतीने आठ कोटीचा निधी मंजूर 

ठाणे: शहराची ओळख मानल्या जाणाऱ्या आणि नाट्यकर्मी आणि नाट्य रसिकांची पहिली पसंती असलेल्या महापालिकेच्या गडकरी रंगायतन नाट्यगृहातील कलाकार आणि रसिक या दोघांनाही सुखद अनुभव मिळेल, हा उद्देश नजरेसमोर ठेवून रंगायतनचे नूतनीकरण केले जाणार असल्याचे आयुक्त बांगर यांनी सांगितले. या नूतनीकरणासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आठ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. 

गडकरी रंगायतनमध्ये रंगकर्मींना तसेच प्रेक्षकांना काही असुविधा जाणवत होत्या. त्याबद्दल तक्रारी आणि सूचना मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडेही नागरिकांनी व्यक्त केल्या होत्या. त्यानुसार महापालिका आयुक्तांनी प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच रंगायतनच्या वास्तूचे स्ट्रक्चरल ऑडिटही करण्यात आले. त्यात मूळ वास्तू सुस्थितीत असून अंतर्गत रचना आणि सुविधा यात आमूलाग्र बदल करण्याची गरज असल्याचे स्पष्ट झाले. त्याप्रमाणे गडकरी रंगायतनच्या नूतनीकरणाचा प्रस्ताव ठाणे महापालिकेने राज्य सरकारकडे दिला होता. त्यास मंजुरी मिळाली असून त्यासाठी आठ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याचे आयुक्तांनी सांगितले. 

१९७८मध्ये बांधण्यात आलेल्या रंगायतनची २००५ मध्ये मोठ्या प्रमाणावर दुरुस्ती करण्यात आली होती. त्यानंतर आता १८ वर्षांनी नुतनीकरण होत आहे. रंगायतनची आसनक्षमता १०८० एवढी आहे. गडकरी रंगायतनमधील सुधारणा करताना रंगायतनचे पारंपरिकपण जपले जाईल. तसेच, काळानुरुप अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील.  गडकरी रंगायतनचे नूतनीकरण करताना कलाकार आणि प्रेक्षक यांच्या अपेक्षा समजून त्यानुसार अंतर्गत सुविधांची रचना केली जाणार आहेत.

 त्यात प्रामुख्याने, मुख्य वास्तूचे मजबुतीकरण, तालीम हॉलचे नुतनीकरण, मुख्य प्रेक्षागृहातील संपूर्ण आसनव्यवस्था बदलणे, रंगकर्मी यांच्यासाठी असलेल्या ग्रीन रूममध्ये आवश्यक सुधारणा, रंगमंच-फ्लोरिंग अद्ययावत करणे, वातानुकूलन यंत्रणेत सुधारणा, शौचालयांचे संपूर्ण अद्यावतीकरण आदी कामांचा समावेश असल्याचे आयुक्त बांगर यांनी नमूद केले. रंगायतनच्या तारखांचे बुकिंग लक्षात घेवून नूतनीकरण कामे केली जातील. 

जेणेकरून कोणाचीही गैरसोय होणार नाही. तसेच कमीत कमी कालावधीत काम पूर्ण करण्याकडे लक्ष दिले जाईल असेही आयुक्तांनी स्पष्ट केले.

Post a Comment

Previous Post Next Post