चाळीस वेळेला पाण्याच्या पाइपलाइन फुटण्याचे प्रकार
डोंबिवली ( शंकर जाधव )
निवासी भागातील काही रस्त्यांचे काँक्रीटीकरण झाल्यानंतर आता रस्त्यांच्या खालून गेलेल्या पाण्याच्या पाइपलाइन, महावितरणच्या विद्युत वाहिन्या, ड्रेनेज वाहिन्या आणि सीईटीपीचा रासायनिक सांडपाणी वाहिन्या यांना नुकसान पोहचल्याने तर काही ठिकाणी पाण्याची गळती होत असल्याने हे नवीन बनविण्यात येत असलेले रस्ते फोडण्यात येत आहेत. गेल्या एक महिन्यात निवासी परिसरात एकूण सहावेळा नवीन काँक्रीटीकरण रस्ते खोदण्यात आले.काँक्रीटीकरण रस्ते बनविताना जेसीबीच्या धक्याने अथवा इतर कारणामुळे पाण्याच्या पाइपलाइन फुटण्याचे प्रकार एकूण चाळीस पेक्षा जास्त वेळा झाले होते. त्यामुळे पाण्याची मोठी गळती आणि अपव्यय होऊन नागरिकांना ही मोठा त्रास सहन करावा लागला होता.
निवासी मधील डॉ. नानासाहेब धर्माधिकारी या मुख्य रहदारीचा रस्त्यावर प्लॉट क्रमांक RL- 97 आणि प्लॉट क्रमांक RX - 01 जवळ एका मोठ्या सोसायटीच्या पाण्याच्या पाइपलाइनला नुकसान पोहचल्याने आणि एमआयडीसीची पाण्याची मुख्य पाइपलाइन रस्त्याचा दुसऱ्या बाजूला असल्याने सदर त्या सोसायटीला पूर्ण रस्ता खोदून नवीन पाइपलाइन टाकावी लागली आहे. एकूण ४२ सभासद कुटुंब असलेल्या या मोठ्या रहिवाशी सोसायटीला गेले आठवडाभर कमी दाबाने पाणी येत होते. त्यामुळे या सोसायटीला दररोज टँकर मागवून पाणी घ्यायला लागत होते. सोसायटीने याबाबत एमआयडीसीकडे तक्रार केली असता त्यांना त्यांच्या सोसायटीची रस्त्याखालील पाइपलाइनला नुकसान पोहचल्याचे समजले. सदर एमआयडीसीची मुख्य पाइपलाइन ही रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला असल्याने नवीन काँक्रीटीकरण रस्ता खोदने आवश्यक होते. पाण्याची पाइपलाइन टाकण्यासाठी प्रशासनाने रस्त्यावर ज्याठिकाणी पेवरब्लॉक बसविले होते त्याच ठिकाणावरून रस्ता खोदण्यास परवानगी दिली. त्यामुळे मोठा वळसा घेऊन सदर सोसायटीला पाइपलाइन टाकावी लागली. या पाइपलाइन टाकण्याचे काम असताना वाहतूक कोंडी झाल्यामुळे त्याच सोसायटीतील सभासद आणि स्थानिक रहिवाशांनी प्रसंगी उभे राहून वाहतुकीचे नियोजन केले. नवीन पाइपलाइन टाकणे, मजुरी खर्च, पाण्याचे टँकर इत्यादी असा बराच मोठा खर्च या सोसायटी रहिवाशी सभासदांना करावा लागला असून हा खर्च रस्ते बनविणारा ठेकेदार, एमएमआरडीए किंवा एमआयडीसी देणार का असा प्रश्न विचारला आहे.
यापूर्वीही याच मार्गावर काही दिवसापूर्वी काँक्रीटीकरण केलेला रस्ता फोडण्यात आला होता. नुकताच आठवड्यापूर्वी मिलापनगर मधील प्लॉट क्रमांक RL-61 जवळ महावितरणची रस्त्याखालील मेन केबलला नुकसान पोहचल्याने असाच काँक्रीटीकरण केलेला रस्ता खोदावा लागला होता. त्यावेळी त्या परिसरातील १४तास वीज पुरवठा खंडित झाला होता. एक महिन्यापूर्वी चैत्रबन सोसायटी ( RH - 113 ) समोर महावितरणची भूमिगत केबल खराब झाल्याने काँक्रीटीकरण रस्ता खोदला होता.
एमआयडीसी निवासी भागातील रस्ते कामाला डिसेंबर 2022 मध्ये सुरू झाल्यावर रस्त्यांची उंची, लगतची पावसाळी गटारे, नाले, ड्रेनेज वाहिन्या आणि पाणी, वीज, महानगर गॅस वाहिन्या इत्यादी प्रश्नाबद्दल तक्रारी येथील नागरिकांनी केल्या होत्या. काँक्रीटीकरण रस्ते बनविण्यापूर्वी योग्य नियोजन करून सदर वाहिन्या योग्य त्या बाजूला हलविण्यात याव्यात अशी येथील नागरिकांची मागणी होती. स्थानिक खासदार आणि आमदार यांनी पाहणी दौरे केले होते. त्यावेळी उपस्थित रहिवाशांबरोबर संबंधित एमएमआरडीए, एमआयडीसी, केडीएमसी इत्यादी प्रशासनाचे अधिकारी आणि रस्त्यांच्या ठेकेदार व त्यांचे अभियंते हे उपस्थित होते. त्यावेळी नागरिकांच्या तक्रारी नुसार आणि या लोकप्रतिनिधी समक्ष हे सर्व प्रश्न सोडविण्याचे आश्वासन या अधिकाऱ्यांनी दिले होते. एमआयडीसी अधिकाऱ्यांनी पाण्याच्या पाइपलाइन या रस्त्यांचा सद्या एका बाजूला असल्याने व काही रस्त्यामध्ये असल्याने त्या बदलून रस्त्यांचा दुतर्फा पाइपलाइन टाकून घेऊ असे सांगितले होते. यापूर्वी एमआयडीसीने अर्धवट, चुकीची पद्धतीने बांधलेल्या गटारांची दुरुस्ती केली जाईल आणि सीईपीटी सांडपाणी वाहिन्या रस्त्याचा कडेला हलविण्यात येतील असे सांगितले होते. महावितरणकडून विद्युत वाहिन्या, डीपी बॉक्स आणि ट्रान्सफॉर्मर हलविण्यात येतील असे सांगण्यात आले होते. केडीएमसी अधिकाऱ्याकडून नाले सफाई आणि इतर रस्ते डांबरीकरण करण्यात येतील असे सांगण्यात आले होते.
काँक्रीटीकरण रस्ते काम सुरू करण्यापूर्वी एमएमआरडीए आणि त्यांचा ठेकेदार कडून याबाबतीत सर्व्हे होणे आवश्यक होते आणि त्यानुसार संबंधित यंत्रणेला पत्र पाठवून त्यांच्याशी विचारविनियम होऊन रस्त्यांचे काम चालू केले असते तर ही आजची परिस्थिती निर्माण झाली नसती असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे.
