बस प्रवासी निवाऱ्याअभावी चिखलात तासनतास उभे
दिवा / आरती मुळीक परब: दिव्यातून ठाणे, नवीमुंबई आणि मुंबईकडे कामानिमित्त प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांचे भर पावसात हाल होत असून हक्काचा प्रवासी निवारा नसल्याने नागरिकांना त्याचा फटका बसत आहे. दिवेकरांना दिवा टर्निंग येथील महोत्सव मैदानाजवळ पावसाच्या तुंबलेल्या पाण्यातून प्रवास करावा लागत आहे. पालिका प्रशासनाने यावर तातडीची उपाययोजना करण्याची मागणी दिवेकर करत आहे.
ठाणे महानगरपालिका आणि नवी मुंबई महानगरपालिका परिवहन सेवेच्या बस दिवा टर्निंगला येतात. रोजची चारशे पाचशे प्रवासी लक्षात घेता या ठिकाणी नागरिकांना रांगेत उभे राहण्यासाठी योग्य व्यवस्था वा प्रवासी निवारा नाही. पर्यायी जागा म्हणून दिवा महोत्सव मैदानाजवळ उभे राहून बस पकडण्यास सांगितले जाते. मात्र गेल्या चार दिवसांपासून पडलेल्या मुसळधार पावसामुळे याठिकाणी पाणी साठत आहे. यामुळे येथे बससाठी थांबणेही कठीण झाले आहे. प्रवाश्यांना बस पकडण्यासाठी पावसात भीजत कसरत करावी लागत आहे. पावसात भिजलेल्या अवस्थेतच त्यांना कामावर जावे लागत आहे.
परिणामी दिवेकर नागरिकांचे हाल होत आहेत. अश्यावेळी कोणतीही शिस्त नसल्याने नागरिक बस पकडण्यासाठी झटापटी करीत आहेत. त्यामुळे महिलांना बसमध्ये शिरणेही कठीण होत आहे. पावसामुळे बस लेट झाल्यास सकाळच्या दरम्यान मोठी गर्दी होऊन चेंगराचेंगरी होत आहे. दरम्यान हक्काचा प्रवासी निवारा नसल्याने नागरिकांना मोठा फटका बसत असून लवरकच प्रवासी निवाऱ्याची निर्मिती करावी अशी मागणी आता दिवेकर नागरिक करीत आहे.
भालचंद्र बेहेरे, ठाणे परिवहन व्यवस्थापक - दिव्यात असणाऱ्या बस थांब्याची जागा ही खाजगी आहे. ती जागा मालकांनी ती दिल्यास आठवडा भरात प्रवासी निवारा लावण्यात येईल. त्यामुळे नागरिकांना ही पावसात न भिजता कामाला जाता येईल.
शैलेश पाटील, नगरसेवक, ठामपा - दिव्यात आधी नवी मुंबई व ठाण्यावरुन येत नव्हत्या. आता कोरोनाच्या वेळेस त्या सुरु करण्यात आल्या. दिवेकरांना नवी मुंबई, ठाणे आणि मुंबईला जाण्यासाठी फक्त रेल्वेवरच अवलंबून राहावे लागत होते. आता बसमुळे त्यांना प्रवास करणे सोयीचे झालेले आहे. ज्या जागेत हा बस थांबा आहे ती जागा खाजगी आहे. त्या जागेचा मोबदला ठाणे महापालिकेने त्या जागा मालकांना द्यावा. म्हणजे ते जागेवाले जागा उपलब्ध करुन देतील. अन् लवकरच नागरिकांना प्रवासी निवारा ही मिळेल.
