नवी दिल्ली: इंस्टाग्रामच्या माध्यमातून जगभरात सर्वाधिक कमाई करणाऱ्यांच्या क्रमवारीत क्रिस्टियानो रोनाल्डोने पहिले स्थान पटकावले आहे. एक इन्स्टा पोस्ट करून तो २६ कोटींहून अधिक कमावतो. दुसऱ्या क्रमांकावर लिओनेल मेस्सी आहे. तर भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली इंस्टाग्रामवरील एका पोस्टमधून सर्वाधिक कमाई करणारा भारतीयच नाही तर आशियाईदेखील आहे. त्याला एका पोस्टमधून ११.४० कोटी रुपये मिळतात. या यादीत प्रियांका चोप्राचाही समावेश आहे.
इंस्टाग्राम आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील प्रायोजित पोस्टसाठी सेलिब्रिटीज करोडो रुपये घेतात हे सर्वांनाच माहीत आहे. प्रसिद्ध फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो पुन्हा एकदा इंस्टाग्रामवर सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू ठरला आहे. सलग तिसऱ्या वर्षी इन्स्टाग्रामवर सर्वाधिक कमाई करणारा ठरला आहे. ही यादी इंस्टाग्राम शेड्युलिंग टूल हॉपर हेडक्वार्टरने संकलित केली आहे. जे अंतर्गत आणि सार्वजनिक उपलब्ध डेटाच्या आधारे तयार केली गेली आहे, ज्या अंतर्गत प्रत्येक युजर Instagram आणि YouTube वर पोस्टसाठी किती शुल्क आकारतो हे पाहता येते.
पोर्तुगालसाठी फुटबॉल खेळणारा क्रिस्टियानो रोनाल्डो प्रत्येक इंस्टाग्राम पोस्टवरून २६.७४ कोटी रुपये कमावतो. इंस्टाग्रामवर रोनाल्डोचे ६०० मिलियन्स फॉलोअर्स आहेत. अर्जेंटिनासाठी विश्वचषक जिंकणारा मेस्सी प्रत्येक इन्स्टा पोस्टसाठी २१.५२ कोटी रुपये घेतो. कोहलीला एका Instagram पोस्टमधून ११.४० कोटीची कमाई होते. कोहलीचे इंस्टाग्राम अकाऊंटवर २५.६ कोटी (२५६ दशलक्ष) फॉलोअर्स आहेत. इंस्टाग्राम अकाउंटवर इतके फॉलोअर्स असणारा तो पहिला आशियाई आहे. या यादीत भारतीयांमध्ये बॉलीवूड आणि हॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा जोनास २९ व्या स्थानावर आहे. अहवालानुसार, त्याने प्रति पोस्टसाठी ४.४० कोटी आकारले.