नवी दिल्ली: कांद्याच्या दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी किंमत स्थिरीकरण निधी अंतर्गत केंद्र सरकार कांद्याचा राखीव साठा ठेवते या वर्षी साठा केलेल्या ३.०० लाख मेट्रिक टन कांद्याच्या बफरसाठ्यातील कांद्याच्या विक्रीला सुरुवात करण्याचा निर्णय केंद्रीय ग्राहक व्यवहार विभागाने घेतला आहे.
केंद्रीय ग्राहक व्यवहार सचिव रोहित कुमार सिंग यांनी नाफेड आणि एनसीसीएफच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची गुरुवारी बैठक घेतली. कांद्याचा साठा खुला करण्याविषयी या बैठकीत चर्चा झाली. त्यानंतर आज हा साठा खुला करण्यात आला. ज्या बाजारपेठांमध्ये कांद्याचा दर, देशातील सरासरी भावापेक्षा अधिक आहे, तिथं हा कांद्याचा साठा पोहोचवला जाणार आहे. त्याचबरोबर राज्यांना सवलतीच्या दरात कांदा उपलब्ध करून देण्याचा निर्णय देखील केंद्राने घेतला आहे. ई लिलाव किंवा ऑनलाइन विक्रीच्या माध्यमातून कांदा ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याच्या पर्यायाचीही चाचपणी सरकार करत असल्याचे सांगण्यात आले आहे.
भारतात महाराष्ट्र, गुजरात आणि मध्यप्रदेश या तीन राज्यांमध्ये कांद्याची शेती मोठ्या प्रमाणावर होते. या तिन्ही राज्यांमध्ये उत्तम कांदा पिकतो. याच कारणामुळे केंद्र सरकारने महाराष्ट्र, गुजरात आणि मध्यप्रदेश या तीन राज्यांमधून मोठ्या प्रमाणात कांदा खरेदी करून साठा करण्याचे काम सुरू केले आहे.
यंदा ऑगस्ट ते डिसेंबर या कालावधीत कांद्याची बाजारातील आवक घटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याच सुमारास केंद्र सरकार परिस्थितीचा आढावा घेऊन टप्प्याटप्प्याने कांदा बाजारात उतरविणार आहे. यामुळे मागणी पूर्ण करण्यासाठी बाजारात कांदा उपलब्ध असेल. सामन्यांना वाजवी दरात कांदा उपलब्ध होईल