सनटेक फाऊंडेशनने वंचित समुदायांमधील मुलांसह स्वातंत्र्यदिन साजरा केला
कल्याण : शाळेमध्ये स्वातंत्र्यदिन साजरा करणे खूप महत्त्वाचे आहे कारण त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये देशाचा इतिहास व मूल्यांविषयी सखोल जाण निर्माण होण्यास मदत होते. १५ ऑगस्ट २०२३ रोजी सनटेक रिअल्टीच्या सनटेक फाऊंडेशनने कल्याण पश्चिम येथे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने वंचित समुदायांमधील मुलांसाठी चालवलेल्या साने गुरुजी प्राथमिक शाळेत ध्वजारोहण समारंभाचे आयोजन केले होते. समाजाच्या वेगवेगळ्या स्तरांमधील विद्यार्थ्यांना एकत्र आणून स्वातंत्र्यदिन साजरा केला जावा, देशाचे स्वातंत्र्य व देश घडवणाऱ्या नायकांप्रती आदर व्यक्त केला जावा हा या उपक्रमाचा उद्देश होता.
सनटेक रिअल्टीच्या कस्टमर एक्स्पीरियंस इवान्जेलिस्ट श्रीमती अनुपमा खेतान यांनी सांगितले, "समुदाय विकासासाठीच्या प्रयत्नांमध्ये सनटेकचा सक्रिय सहभाग असतो. सामाजिक व सांस्कृतिक प्रगतीला चालना दिली जावी हे आमचे उद्दिष्ट आहे. सक्षमता उपक्रमांच्या माध्यमातून आम्ही पर्यावरणानुकूल वृद्धीला प्रोत्साहन देतो. समुदायाच्या कल्याणमध्ये वाढ करण्यासाठीची आमची वचनबद्धता यामधून दर्शवली जाते."
साने गुरुजी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ अनिता धैर्यसिंग तायडे/कोळी यांनी या उपक्रमाविषयी सांगितले, "सनटेकने दिलेल्या पाठिंब्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. अशाप्रकारच्या सहकार्यामुळे शिक्षणात प्रगती घडवून आणण्यात व विद्यार्थ्यांमध्ये आपलेपणाची, सामुदायिक जबाबदारीची जाणीव निर्माण करणारे वातावरण निर्माण करण्यात मदत मिळते. मुलांचे शाळाप्रवेश व शाळेतील उपस्थिती यावर याचा सकारात्मक परिणाम होतो."
साने गुरुजी प्राथमिक शाळेतील विद्यार्थी, शिक्षक आणि स्वयंसेवकांनी ध्वजारोहण समारंभामध्ये अतिशय उत्साहाने भाग घेतला. सर्वांनी मिळून गायलेल्या राष्ट्रगीतामुळे संपूर्ण वातावरण देशाभिमान व देशभक्तीने भारून गेले. देशभक्तीपर उपक्रमांमध्ये सहभागी झाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये देशाभिमान जागृत होतो, स्वातंत्र्याचे नेमके महत्त्व समजते आणि सक्रिय नागरिकतेला प्रोत्साहन मिळते.