बदलापूरः ठाणे जिल्ह्यातील बहुतांश शहरांची तहाण भागवणाऱ्या बारवी धरण ओसांडून वाहू लागले. त्यामुळे ठाणे जिल्ह्याची पाण्याची चिंता मिटली आहे. बारवी धरणाची क्षमता ३३८.८४ दशलक्ष घनमीटर इतकी असून मंगळवारी धरणाने आपली ७२.६० मीटर पाणी पातळी गाठून धरण ओसांडून वाहू लागले. पावसाचा जोर सध्या या भागात नसला तरी ही धरणातील पाण्याच्या पातळीत होणारी वाढ पाहता धरणा शेजारील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मंगळवारी दुपारी बारा वाजता च्या दरम्यान धरणातील ११ पैकी आठ स्वयंचलित दरवाजे उघडले गेले.
२५ जूनपासून पावसाला सुरूवात झाली असली तरी धरणक्षेत्रात पुरेसा पाऊस पडत नव्हता. त्यामुळे १ जुलेै रोजी धरणात अवघे ३१.७० टक्के पाणीसाठा होता. मात्र त्यानंतर धरणक्षेत्रात झालेल्या दमदार पावसाने एकच महिन्याच्या काळात बारवी धरणात तब्बल ६९ टक्क्यांची भर पडली १ जुलै रोजी धरणात १०७.४० दशलक्ष घनमीटर इतके पाणी होते. तर मंगळवारी १ ऑगस्ट रोजी बारवी धरण आपल्या पूर्ण क्षमतेने भरले होते. त्यामुळे मंगळवारी दुपारनंतर बारवी धरणातून पाणी ओसांडून वाहू लागले. पावसाचा जोर कमी असल्याने बारवी धरण ९८ टक्क्यांवरून शंभर टक्क्यांवर जाण्यासाठी दोन ते तीन दिवसांचा कालावधी लागला. बारवी धरण भरल्याने अंबरनाथ उल्हासनगर कल्याण ठाणे भिवंडी आणि ठाणे जिल्ह्यातील एमआयडीसी यांचा पाणी प्रश्न कायमचा मार्गील निघाला आहे.