आगरी युथ फोरमतर्फे यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव

  

                   

                             

डोंबिवली ( शंकर जाधव )  : समाजातील विद्यार्थ्यांनी प्रत्येक क्षेत्रात सर्वोच्चस्थानी असायला पाहिजे. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून गेली तेहतीस वर्ष यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत असतो.आगरी युथ फोरम शिक्षण क्षेत्राबरोबर आध्यात्मिक क्षेत्र, साहित्यक्षेत्र आणि समजासाठी संघर्ष समिती बरोबर राहून सर्व क्षेत्रात काम करीत आहे. आपल्याला पुढील पिढी घडवायची आहे. गेली तेहतीस वर्ष फोरम काम करीत आहे. कामे करीत असताना लोक काहीही बोलतात पण त्याकडे दुर्लक्ष करून समाजासाठी काम करणे हा फोरमचा उद्देश होता आणि पुढेही आहे असे गौरव उदगार आगरी युथ फोरमचे अध्यक्ष गुलाब वझे यांनी काढले.

पूर्वेकडील मानपाडा रोडवरील होरायझन सभागृहात आगरी युथ फोरम माध्यमातून यशस्वी विद्यार्थ्यांच्या कौतुक सोहळा रविवारी आयोजित करण्यात आला होता त्यावेळी गुलाब वझे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा माजी मंत्री जगन्नाथ पाटील, इंडिया व साउथ एशिया स्टॅण्डर्ड चार्टर्ड बँक चे एम.डी. विनोद पाटील, सर्व पक्षीय हक्क संरक्षण समितीचे अध्यक्ष गंगाराम शेलार, सचिव चंद्रकांत पाटील, जेष्ठ नेते वसंत पाटील, गोवर्धन भगत, आगरी-कोळी मेडिकोज अध्यक्ष डॉ. दिनेश म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी गुलाब वझे पुढे म्हणाले, विद्यार्थ्यांनी समाजासाठी योगदान दिले पाहिजे. गावाचे जे प्रश्न आहेत ते सर्वांनी एकत्र येऊन सोडवले पाहिजेत त्याला नक्कीच यश मिळेल. पूर्वीही गावातील बांधकामांचा प्रश्न होता, आता आजही आहे, पण यातूनही मार्ग निघेल. आपल्या घरांना लाखो रुपयांचा टॅक्स लावला जात आहे. तो विषय मार्गी लावायचा आहे. आज या सर्व कामात समाजातील पदाधिकारी काम करीत आहेत. हे सर्व शिक्षणाच्या जोरावरच होत आहे, त्याला समाजाचा पाठिंबा आहे. चांगल्या कामासाठी सर्वजण उभे राहतात. नवी मुंबई विमानतळाला दि.बा. पाटील नाव द्यायचं आहे, ही भूमिका सर्वांचीच आहे. येत्या क्रांतीदिनाचे औचित्य साधून त्या विमानतळाच्या जागेत दि.बां च्या नावांचे फलक लावायचे आहेत. त्याचप्रमाणे कोपरचे संत सावळाम महाराज यांचे स्मारक व्हावं, तेही भव्यदिव्य व्हावं, यासाठी सर्वजण मेहनत घेत आहेत. पुर्वी मोठ्या क्रीडांगणाला संत सावळाराम म्हात्रे क्रीडा संकुल असे नामकरण आपण करून घेतले आहे. आता कचोरे येथे दहा एकर जागेत संत सावळाराम महाराज स्मारक अध्यात्मिक केंद्र होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याकरिता हिरवा कंदील दाखवला आहे. जागेवर संत सावळाराम अध्यात्मिक केंद्र असे रिझर्वेशन टाका असे निर्देश दिले आहेत. त्यामुळे ही जागा निश्चित स्मारकासाठीच राहील. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. समाजातील सर्व विद्यार्थ्यांना या गोष्टी समजल्या पाहिजेत. आगरी युथ फोरम आध्यात्मिक क्षेत्र, साहित्यक्षेत्र आणि संघर्ष समिती बरोबर इतर सर्व क्षेत्रात काम करीत आहे. आपल्याला पुढील पिढी घडवायची आहे. गेली तेहतीस वर्ष फोरम काम करीत आहे. कामे करीत असताना लोक काहीही बोलतात पण त्याकडे दुर्लक्ष करून समाजासाठी काम करणे हा फोरमचा उद्देश होता आणि पुढेही आहे.

तर वसंत पाटील म्हणाले, यशस्वी शिक्षण हा यशस्वी जीवनाचा पाया असतो. हे यश तुमच्या पुढील जीवनासाठी निश्चित उपयोगी ठरेल. शिक्षण समाजाच्या तसेच देशाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. आगरी युथ फोरम माध्यमातून अनेक मोठी कामे झाली आहेत. दरम्यान चंद्रकांत पाटील म्हणाले, प्रत्येकाने समाजाप्रती सजग राहिलं पाहिजे.

यावेळी इंडिया व साउथ एशिया स्टॅण्डर्ड चार्टर्ड बँक चे एम.डी. विनोद पाटील यांनी यशस्वी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना सांगितले की, आपला समाज परिवर्तनाच्या उंबरठ्यावर आहे. विकासाची गंगा आपल्या दारात वाहत आहे. काही लोक यामध्ये आपला स्वतःचा फायदा करून घेत आहेत. काही लोकं वेगवेगळ्या स्थळावर आपलं यश संपादित करीत आहेत. असं असलं तरी पूर्वीची परिस्थिती वेगळी होती. पूर्वी साधा पास क्लास मिळाला तर आर्ट, मध्यम असेल तर कॉमर्स आणि छान-उत्तम गुण मिळाले तर सायन्स असं समीकरण असे. पण आता तसं नाही. ज्यामध्ये आपण हमखास यश मिळवून उत्तुंग शिखर गाठू शकतो असे कोणतेही क्षेत्र करियरसाठी निवडलं पाहिजे. आता प्रत्येक सेक्टरमध्ये उच्च स्थानी असणे महत्त्वाचे आहे. इन्शुरन्स सेक्टर मध्ये चांगली संधी आहे. डेटा सायन्स मध्येही चांगली संधी आहे. बॅचलर ऑफ फायनान्सिंग करायचं असेल तर जरा हटके करा, काही करायचं असेल तर जरा हटके करा, जबरदस्त असं करा की तुम्हाला रिस्पेक्ट वाढेल. काहीतरी थातुरमातुर करून जॉब मिळणं कठीण आहे. नॅशनल लॉ मध्येही चांगली संधी आहे. करियर मार्गदर्शन देणाऱ्या बराच संस्था आहेत त्यांचे सहकार्य घ्या. ट्रेडिशनल कोर्सचा डिमांड खूप कमी झाला आहे. वेगळं काहीतरी करा तर तुमची प्रगती चांगली होईल तुम्ही कोणते क्षेत्र निवडता यावर सर्व अवलंब आहे. स्पर्धा खूप आहे इंग्रजी चांगलं पाहिजे. इंग्रजी आज आवश्यक आहे. इंग्रजी वाचा, इंग्रजी कसं चांगलं होईल याकडे फोकस करा असा मोलाचा सल्ला दिला.

Post a Comment

Previous Post Next Post