डोंबिवली ( शंकर जाधव ): वाहतूक पोलिसांकडून अन्यायकारक दंड वसुली केल्याने रिक्षाचालक हैराण झाले असून वाहतूक पोलिसांना याचा जाब विचारण्यासाठी शुक्रवारी भाजप प्रणित रिक्षा चालक मालक संघटनेने रिक्षाचालकांसह डोंबिवली वाहतूक नियंत्रण उपशाखेवर धडक मोर्चा काढला.
भाजप प्रणीत रिक्षाचालक –मालक संघटनेने वाहतूक पोलीस निरीक्षक गित्ते यांची भेट घेऊन आपल्या मागण्या मांडल्या.भाजपा प्रणित रिक्षाचालक मालक संघटनेचे अध्यक्ष दत्ता माळेकर यांनी शुक्रवारी भाजप कार्यालयात रिक्षाचालकांची बैठक बोलावली होती. यावेळी माळेकर म्हणाले,आधीच रिक्षाचालकांवर कर्ज असून त्यात वाहतूक पोलीस अन्यायाकरण दंड वसूल करीत आहेत. नेहमी नेहमी हे प्रकार होत असल्याने याबाबत आम्ही वाहतूक पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांची भेट घेतली.
वाहतूक पोलिसांकडून अशीच कारवाई सुरु राहिली तर आम्हालाही यावर एकमताने निणर्य घ्याव लागेल. यावेळी संघटनेचे पदाधिकारी संतोष आतकारे, रवी जाधव, एकनाथ माळी, संजय चेके, प्रदीप ढवळे, प्रदीप शिंदे, दीपक पवार यांसह भाजपा रिक्षा संघटनेचे रिक्षाचालक उपस्थित होते. तर शहरातील वाहतूक व्यवस्था सुरक्षित राहावी याकरता वाहतूक पोलीस काम करत असतात. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकी व चारचाकी वाहनांवर कारवाई केली जाते. रिक्षाचालकांवर अन्यायकारक दंड आकाराला जात आहे हे म्हणणे चुकीचे आहे, जे नियमात व कायद्यात आहे तेच काम वाहतूक पोलीस करत असल्याचे डोंबिवली वाहतूक निरीक्षक उमेश गित्ते यांनी सांगितले.