कल्याण रेल्वे स्टेशनवरील धक्कादायक प्रकार
आठ तासात मुलाची सुटका
डोंबिवली ( शंकर जाधव ) : कल्याण रेल्वे स्टेशनवरील वेटिंग रूम मधून चार वर्षाच्या मुलाचे अपहरण झाल्याची घटना घडली घडली होती. याप्रकरणी कल्याण रेल्वे गुन्हे शाखेने आठ तासात मुलाची अपहरणकर्त्याच्या तावडीतून सुटका केली.मुलाच्या हव्यासापोटी त्याने या चिमुकल्याचा अपहरण केल्याचं तपासात उघड झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, कचरू वाघमारे असे या अपहरणकर्ताचे नाव आहे. कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात एक मजूर कुटूंब राहते.पती पत्नी दोन वर्षाची मुलगी आणि चार महिन्याचा मुलगा असे कुटुंब आहे. सोमवारी सकाळी हे कुटूंब कपडे धुण्यासाठी कल्याण रेल्वे स्टेशन वरील वेटिंग रूममध्ये आले. मात्र साबण नसल्याने आपल्या दोन्ही मुलांना वेटिंग रूम मध्ये खेळताना सोडून हे साबण घेण्यासाठी पती पत्नी स्टेशन बाहेर गेले. या दरम्यान त्यांनी बाहेर जाताना त्या ठिकाणीच असलेल्या एका कुटुंबाला त्यांनी मुलांकडे लक्ष देण्यास सांगितले होते.परत आल्यावर आई वडिलांना वेटिंग रूममधून आपला चार वर्षाचा मुलगा दिसला नाही. त्यांनी मुलाचा शोध घेतला. मात्र मुलगा आढळून आला नाही.
अखेर त्याने कल्याण रेल्वे गुन्हे पोलीस ठाण्यात कळविले. कल्याण रेल्वे गुन्हे शाखेने तत्काळ या मुलाचा शोध सुरू केला. पोलिसांनी स्टेशन परिसरातील सीसीटीव्ही तपासले असता सायंकाळी आठ वाजताच्या सुमारास कल्याण रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्मवर नाशिकला जाणारी ट्रेन पकडण्याच्या घाईत जात असलेला एक दिसला. या व्यक्तीवर पोलिसांना संशय आल्याने रेल्वे गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला पकडून ताब्यात असलेल्या मुलाची सुटका केली.
पोलिसांनी त्या व्यक्तीकडे चौकशी केली असता त्याचे त्याला चार मुली असून एकही मुलगा नव्हता. त्याला मुलगा हवा होता त्या मुळे मुलाच्या हव्यासापोटी त्याने अपहरण केल्याचे सांगितले.