नाशिक: नाशिक शहरातील मखमलाबाद परिसरातील मराठा विद्या प्रसारक समाजाच्याशैक्षणिक संकुलात आयोजित समाजदिन सोहळ्यात अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी ऐतिहासिक घटनांबाबत वारंवार वादग्रस्त विधानं करणारे संभाजी भिडे यांच्यावर टीका केली आहे. आपले देव ओळखायला शिका, ज्यांनी आपल्यासाठी शिक्षणाची दारे उघडी केली तेच आपल्यासाठी देव आहेत. ब्राह्मण समाजात शिवाजी, संभाजी अशी नावं ठेवत नाहीत, अशा शब्दांत भुजबळांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.
छगन भुजबळ म्हणाले की, "काही लोक म्हणतात, तुम्ही इकडे तिकडे गेलात. पण आम्ही कुठेही गेलो तरी शाहू-फुले-आंबेडकरांचा वारसा सोडणार नाही. संभाजी भिडे यांचे खरे नाव मनोहर कुलकर्णी आहे. खरंतर ब्राह्मण समाजाने वाईट वाटून घेण्याचे कारण नाही. पण कुठल्याही ब्राह्मण घरामध्ये कोणीही शिवाजी, संभाजी नाव ठेवत नाहीत. हा माणस उठूनसुठून कुणावरही टीका करत असतो. त्यामुळे इतिहास मोडणाऱ्यांविरोधात आपल्याला उभे राहावे लागेल" आम्ही सत्तेत आलो कारण फुलेंनी तेच सांगितलं राजक्रांतीकारकांपासून समाजक्रांतीकारकांपर्यंतचा आपला इतिहास आहे त्यांचा आदर आपण जपला पाहिजे. आम्ही सत्तेत का सामिल झालो हे मी आधीही सांगतलं आहे. महात्मा फुलेंनी सांगितले होते की, सत्तेविना झाल्या सर्व कळा अवकळा. तसेच डॉ. बाबासाहेबांनी देखील सांगितले होते शिका आणि सत्तेत सामिल व्हा. बाबासाहेब सत्तेत सामिल झाले आणि आपल्याला संविधान मिळाले"
आपले देव ओळखायला शिका, आपल्याला शिक्षण दिले ते महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, शाहू महाराज आणि कायद्यात ज्याचे पूर्ण रुपांतर केले ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यानंतर भाऊराव पाटील आणि नंतर रावसाहेब थोरात यांनीच आपल्याला शिक्षणाची दारं उघडी करून दिली. पण कुणाला सरस्वती, शारदा आवडते पण आम्ही काही यांना कधी पाहिले नाही. आम्हाला काही त्यांनी शिक्षण दिले नाही. पण आम्हाला ज्यांनी शिक्षण दिले ते या लोकांनी दिले म्हणून ते माझे देव आहेत. तेच देव तुमचे असले पाहिजेत, असे ही भुजबळ यांनी म्हटले.