रोहित शर्मा कर्णधारपदी तर हार्दिक पांड्या उपकर्णधार
नवी दिल्ली : ३० ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या आशिया चषकासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आलीय आहे. बीसीसीआय निवड समितीने १७ खेळाडूंची निवड केली आहे. संघाची जबाबदारी रोहित शर्माच्या खांद्यावर देण्यात आली असून या संघातून युजवेंद्र चहल आणि आर. अश्विन यांना डच्चू देण्यात आला आहे. हार्दिक पांड्या उपकर्णधाराच्या भूमिकेत असेल.
आशिया कपद्वारे विकेटकीपर बॅट्समन केएल राहुल आणि श्रेयस अय्यर संघात कमबॅक करणार आहे. श्रेयसला गेल्या अनेक महिन्यांपासून पाठदुखीचा त्रास जाणवत होता. तर के एल राहुलला आयपीएल १६ व्या मोसमादरम्यान दुखापत झाली होती. या दोघांनी एनसीएमध्ये कमबॅकसाठी कठोर परिश्रम घेतले. ३० ऑगस्ट ते १७ सप्टेंबर दरम्यान आशिया चषकाचे सामने होतील. भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि नेपाळ या देशांमध्ये ही स्पर्धा रंगेल. एकदिवसीय १३ सामन्यानंतर आशियाचा किंग कोण हे ठरेल. दरम्यान आशिया चषक हा विश्वचषकासाठी रंगीत तालीम असणार आहे.
आशिया चषकात भारत आणि पाकिस्तानचा अ गटात समावेश करण्यात आलाय. तसेच नेपाळच्या संघाचादेखील यात समावेश करण्यात आलाय. तर ब गटात बांगलादेश, श्रीलंका आणि अफगाणिस्तान या संघाचा समावेश आहे. भारत २ सप्टेंबरला कँडीमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या मोहिमेला सुरुवात करेल. त्याच मैदानावर त्यांचा दुसरा सामना ४ सप्टेंबरला नेपाळविरुद्ध होणारय. सुपर फोर टप्प्यातील सामने ६ सप्टेंबरला लाहोर येथे संबंधित गटातील A१ आणि B२ संघांमधील संघर्षाने सुरू होतील. उर्वरित सामने कोलंबो, श्रीलंकेत होणार असून१७ सप्टेंबरला कोलंबो येथे अंतिम सामना होणार आहे.
मुख्य निवडकर्त्यांनी सांगितले की विश्वचषकाची निवड ५ सप्टेंबर रोजी आहे. तिलक वर्माच्या विश्वचषकातील संधींबाबत आगरकर म्हणाले की, आशिया कप ही त्याच्यासाठी मोठी संधी आहे. जर त्याने विश्वचषक संघात स्थान मिळवले तर तो आशियाई क्रीडा स्पर्धेत भाग घेणार नाही. तिलकने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वेस्ट इंडिज दौऱ्यावर पदार्पण केले, जिथे त्याने बॅटने धावा केल्या. तो उत्कृष्ट फॉर्ममध्ये धावत आहे. अशा स्थितीत आशिया कप ही त्याच्यासाठी संधी आहे.
ही आहे टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, के एल राहुल, ईशान किशन, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, कुलदीप यादव जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा.