कल्याण स्टेशन परिसरात गरोदर महिलेला प्रसूतीच्या वेदना
पालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयाचा दाखल करण्यास नकार
डोंबिवली ( शंकर जाधव ) : कल्याण- डोंबिवली महानगरपालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयाने गरोदर महिलेला रुग्णालयात दाखल करण्यास नकार दिल्याने रुग्णलयाच्या प्रवेशद्वाराच प्रसूती झाली.या घटनेने पालिकेचे रुग्णालय गरीब रुग्णांसाठी नसून तो एक प्रशासनाचा दिखावाच आहे असे दिसून आले.कल्याण स्टेशन परिसरात गरोदर महिलेला प्रसूतीच्या वेदना सुरू झाल्या होत्या. त्या महिलेला रुक्मिणीबाई रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेले होते.
कल्याणच्या स्काय वॉकवर मोलमजुरी करून राहणाऱ्या सकीना नावाच्या महिलेला पोटात दुखत असल्याचा फोन महात्मा फुले पोलिसांना आला होता.तात्काळ दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी स्कायवॉक वर धाव घेत या महिलेचा शोध घेतला असता वेदनेने विव्हळात असलेली ही महिला पोलिसांना दिसली. पोलिसांनी इतर महिलांच्या मदतीने तातडीने स्ट्रेचरवरून महिलेला रुक्मिणीबाई रुग्णलयात दाखल करण्यासाठी नेले होते.मात्र गरोदर महिलेला दाखल करण्यात येऊ शकत नाही असे येथील डॉक्टरांनी सांगिल्यावर आधी सर्वांना आश्चर्य वाटले.खूप विनवण्या करूनही डॉक्टरांची नकारघंटा ऐकूण सर्वजण संतापले. महिलेची जवळपास प्रसूती होत आल्याने अखेर फिरस्ता महिलांनीच रुग्णालयाच्या बाहेरील रस्त्यावर या महिलेची प्रसूती केली. अखेर याबाबत वरिष्ठ पोलिसांनी रुग्णालयातील वरिष्ठांना कळविल्यानंतर रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी या महिलेला आत नेत बाळाची नाळ कापत या महिलेसह बाळाला वायले नगर येथील प्रसूती केंद्रात पाठवले. मात्र या घटनेमुळे पालिकेच्या आरोग्य व्यवस्था हा केवळ दिखावाच असून जर गरीब रुग्णांना उपचार मिळत नसतील तर हे रुग्णालय बंद करा अशा प्रतिक्रिया नागरिकांकडून आल्या.

