कल्याणमध्ये सात लाखाची एमडी पावडर जप्त

नायजेरियनसह तीन महिलांना अटक

डोंबिवली : कल्याण कोळसेवाडी आणि खडकपाडा पोलिसांनी एकाच दिवशी  कारवाई करत ७ लाख १५ हजार रुपयाचा एमडी पावडर जप्त केली. या कारवाईत चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्या आरोपींमध्ये नायजेरियनसह इराणी महिलेचा समावेश आहे. कल्याणमध्ये प्रथमच इतकी मोठी कारवाई करण्यात आल्याची माहिती कल्याण सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे यांनी दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण पूर्वेतील १०० फुटी रोडवर नाकाबंदी दरम्यान एका रिक्षाचालकाने पोलिसांना पळ काढला. याबाबत पोलिसांना संशय आल्याने पाठलाग रिक्षा पकडली. रिक्षातील दोन तरुणांची झडती घेतली असता त्यांच्याकडे ५.६ ग्रॅम वजनाची ३३ हजार ६०० रुपयाची एमडी पावडर आढळून आली. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली. या आरोपींकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी नवी मुंबईतील चुकवू इमेका जोसेफ इमेका या ४२ वर्षीय व्यक्तीकडून एमडी पावडर खरेदी केली असून याची विक्री कल्याण पूर्वेत  करणार असल्याचे सांगितले. 

या माहितीच्या आधारे कोळसेवाडी पोलिसांनी नवी मुंबईतील वाशी परिसरातून सदर नायजेरियन व्यक्तीला ताब्यात घेत त्याच्याकडील २७९ ग्रॅम वजनाची ५ लाख ५८ हजार रुपये किमतीची एमडी पावडर जप्त केली आहे. या तिघांनाही अटक करण्यात आली आहे. खडकपाडा पोलिसानी आंबीवली परिसरात केलेल्या कारवाईत फिजा इराणी या महिलेकडे ३४ ग्रॅम एमडी पावडर आढळली. या अमली पदार्थांची बाजारातील किंमत ६८ हजार रुपये इतकी असून या अमली पदार्थांची एकत्रित रक्कम ७ लाख १५ हजार रुपये इतकी आहे. कल्याणमध्ये प्रथमच इतकी मोठी कारवाई करण्यात आल्याची माहिती कल्याण एसीपी कल्याणजी घेटे यांनी दिली असून पुढील तपास कोळसेवाडी पोलीस करत आहे.


Post a Comment

Previous Post Next Post