गोलंदाजांमध्ये कुलदीपची सातव्या स्थानी झेप
दुबई : आयपीएल सामन्यात शानदार फलंदाजीचे प्रदर्शन करून भारतीय संघात स्थान मिळविलेल्या भारताचा युवा सलामीवीर शुभमन गिलने सध्या सुरू असलेल्या आशिया चषक स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. श्रीलंका आणि पाकिस्तान सामन्यात भारतीय संघाने विजय संपादन केला. मात्र या विजयात शुभमन गिलचा मोठा वाटा आहे. त्याच प्रदर्शनाच्या बळावर गिलने जागतिक एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीत दुसरे स्थान मिळवले. २४ वर्षीय गिलने कारकीर्दीत प्रथमच दुसऱ्या स्थानापर्यंत मजल मारली आहे. भारतीय विराट कोहली आणि रोहित शर्मा या अनुभवी फलंदाजांनीही अव्वल १० खेळाडूच्या क्रमवारीत स्थान पटकावले आहे. गोलंदाजी क्रमवारी फिरकीपटू कुलदीप यादवने सातवे स्थान प्राप्त केले आहे.
आशिया स्पर्धेत गिलने आतापर्यंतच्या चार सामन्यांत दोन अर्धशतकांसह १५४ धावा केल्या आहेत. त्यामुळे गिलने एका स्थानाने आगेकूच करत दुसरा क्रमांक पटकावला आहे. त्याच्या खात्यात आता ७५९ गुण असून पाकिस्तानचा बाबर आझम ८६३ गुणांसह अग्रस्थानी राहिला आहे.
कोहली व रोहित यांनी क्रमवारीत प्रत्येकी दोन स्थानांनी मजल मारत आठवे आणि नववे स्थान मिळवले. कोहली ७१५ गुणांसह आठव्या, तर रोहित ७०७ गुणांसह नवव्या क्रमांकावर आहे. कोहलीने आशिया चषकातील चार सामन्यांत एका शतकासह १२९ धावा केल्या आहेत. तर रोहितने भारतासाठी या स्पर्धेत सर्वाधिक १९४ धावा करताना तीन अर्धशतके झळकावली आहेत.
गोलंदाजी क्रमवारीत ऑस्ट्रेलियाचा जोश हेझलवूड या यादीत अग्रस्थानी आहे. तर अष्टपैलूंमध्ये भारताचा हार्दिक पंड्या सहाव्या स्थानी टिकून आहे. चायनामन कुलदीपने गेल्या दोन सामन्यांत तब्बल नऊ बळी पटकावत सातव्या स्थानावर झेप घेतली आहे. मोहम्मद सिराज नवव्या स्थानी कायम आहे. ४ वर्षांनी प्रथमच भारताच्या तीन फलंदाजांना जागतिक क्रमवारीतील अव्वल १० खेळाडूमध्ये स्थान मिळविता आले आहे. जानेवारी २०१९ मध्ये रोहित, विराट व शिखर धवन हे तीन भारतीय क्रमवारीत पहिल्या १० फलंदाजांमध्ये होते.
.jpeg)