टेंभीनाक्यावर हंडीचा जल्लोष

 २ लाख ५१ हजार रुपयांचे पारितोषिक

ठाणे : धर्मवीर आनंद दिघे यांनी ठाण्यात टेंभीनाका येथे दहीहंडी उत्सव सुरू करून साहसी उत्सवाला एका उंचीवर नेऊन ठेवले. तोच उत्साह, तीच तरुणाईची धुम, थरांचा थरार आणि गोविंदा रे गोपाळाचा जयघोष, मान्यवरांची मांदियाळी, गीत संगीतासह भगव्याचा जल्लोष यंदा गुरुवार ७ ऑगस्ट रोजी टेंभीनाक्यावर पहायला मिळणार असून हा दिमाखदार सोहळा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा होणार आहे.

मुंबईचा जल्लोष आणि उत्साह ठाण्यात आणण्यासाठी धर्मवीर आनंद दिघे यांनी टेंभीनाक्यावरची हंडी मोठ्या जल्लोषात साजरी करण्याचा चंग बांधला. आनंद दिघेंची प्रथा विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही परंपरा कायम ठेवत या महोत्सवाला वेगळे वलय निर्माण करून दिले. यंदा पुन्हा एकदा त्याच दिमाखात यंदा अनुभवायला मिळणार आहे. टेंभीनाक्यावरच्या हंडीत बक्षीसांबरोबरच त्याच दिवशी जाहीर केलेली बक्षीसे रोख स्वरुपात देण्यात येतात. खास मराठमोळा साज दिमाखदार सोहळा व आकर्षक बक्षीसे यामुळे ठाण्यातील ही परंपरा असलेली हंडी ठाण्याची मानाची हंडी म्हणून ओळखली जात आहे.

हा दिमाखदार सोहळा साजरा करताना ठाणे व मुंबईतील गोविंदा पथकांकरीता प्रत्येकी रोख बक्षीस व आकर्षक चषक देण्यात येणार आहे. या हंडीसाठी जाहीर करण्यात आलेले बक्षीस हे मानवी शक्ती असलेल्या थराकरीता आहे. दहीहंडी हा पारंपारिक उत्सव असून साहसी खेळही आहे. या खेळाच्या पाठिशी शासन खंबीरपणे उभे असल्याचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यावेळी नमूद केले.

या दहीहंडी उत्सवात नामवंत गायक तसेच चित्रपटसृष्टीतील नामवंत कलाकारांचा नृत्य व संगीतमय जल्लोष असणार आहे. तसेच सुप्रसिध्द मराठी व हिंदी चित्रपट व मालिकांमधील प्रसिद्ध नायक/नायिका उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्राच्या लोककलेचा नृत्याविष्कार सुप्रसिध्द लावणी सम्राज्ञी आपल्या आकर्षक नृत्याने प्रेक्षकांचे मनोरंजन तसेच या उत्सवात आपल्या सुमधूर व जल्लोषमय गाण्यांनी येणाऱ्या गोविंदांना बेधुंद करणार आहेत. त्याचबरोबर उत्तम असा साउंड तसेच नेत्रदिपक रोषणाई या कार्यक्रमाची शोभा वाढविणार आहे. तसेच टेंभीनाक्यावर येणाऱ्या गोविंदा पथकांसाठी दुपारच्या जेवणाची सोय करण्यात येणार आहे.

हा दहीहंडी महोत्सव यशस्वी करण्याकरिता खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, उपजिल्हाप्रमुख रमेश वैती, ठाणे शहर संघटक अशोक वैती, शिवसेना ठाणे शहर विधानसभा प्रमुख हेमंत पवार, टेंभीनाका मित्रमंडळाचे माजी नगरसेवक सुधीर कोकाटे विभाग प्रमुख कमलेश चव्हाण आदी विशेष प्रयत्न करीत असल्याचे शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांनी नमूद केले.


विविध पुरस्कार

या दहीहंडी महोत्सवात मुंबई व ठाण्यातील गोविंदासाठी वेगवेगळी हंडी लावण्यात येणार आहे. मुंबईतील गोविंदा पथकासाठी व ठाण्यातील गोविंदा पथकासाठी प्रत्येकी २ लाख ५१ हजार रुपयांचे पारितोषिक, सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. महिला गोविंदा पथकासाठी १,००,००० रुपयांचे पारितोषिक ठेवण्यात आले आहे. तर सात थर लावणाऱ्या गोविंदा पथकांसाठी १२,००० हजार, सहा थरांसाठी ८,००० हजार, पाच थरांसाठी ६००० हजार तर चार थर लावणाऱ्या गोविंदा पथकांसाठी ५००० हजार रुपयांचे पारितोषिक ठेवण्यात आले आहे. दहीहंडी फोडणाऱ्या गोविंदांच्या सुरक्षेसाठी रॅपलिंगसाठी असणारे दोरखंड वापरण्यात येणार असल्याचे शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांनी नमूद केले.


Post a Comment

Previous Post Next Post