डोंबिवली ( शंकर जाधव ) : गणेशोत्सवाचे औचित्य साधून ऑल इन वन गुरूजी या संस्थेमार्फत समाजाभिमुख संकल्पनेचा १ सप्टेंबर रोजी शुभारंभ झाला.सचीन कुलकर्णी ( गुरूजी) यांच्या संकल्पनेनुसार आयटीतज्ञ सारंग धारगळकर यांनी ऑल इन वन गुरूजी या ॲपची निर्मिती केली. याच ॲपचा उद्घाटन समारंभ उत्साहात संपन्न झाला.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून लेखिका मीना गोडखिंडी, विशेष अतिथी डॉ.प्रा.विनय भोळे,आयोजक सचिन कुलकर्णी.सारंग धारगळकर, वृध्दाश्रम प्रमुख नाडकर्णी, ज्योतिषतज्ञ हर्डीकर आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होती.चतुर्थीच्या निमित्ताने दिलेली अनमोल अशी सदिच्छा भेटच 'ऑल इन वन गुरूजी' या संस्थेने समाजाला दिलेली आहे.
दीपप्रज्वलन,मंत्रजागर व प्रार्थना झाल्यावर पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले.. त्यावेळी सचिन कुलकर्णी ( गुरुजी ) म्हणाले, १९ सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपतीची स्थापना व पूजा करण्यासाठी गुरूजींची उपस्थिती गरजेची असते.पण वेळेअभावी गुरूजींना सर्वच ठिकाणी जाणे शक्य नसते.म्हणून माझ्या मनातील या संकल्पनेला सारंग धारगळकर यांनी ऑल इन वन गुरूजी या अत्यंत उपयुक्त ॲपची निर्मिती केली.! तर सारंग धारगळकर यांनी या ॲपच्या जडणघडणीची माहिती दिली.ऑल इन वन गुरूजी यांच्या यूट्यूब चॅनेलवरून १९ सप्टेंबरला पाच वेळा यूट्यूब लाईव्ह च्या माध्यमातून गणेश मूर्तीची स्थापना व विधीवत पूजा ऑनलाईन सांगण्यात येईल. यानंतर मीना गोडखिंडी व डॉ.विनय भोळे यांनी या ॲपचे उद्घाटन केले. यानंतर नाडकर्णी व हर्डीकर यांनी मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या.
विशेष अतिथी म्हणून बोलताना डॉ.भोळे म्हणाले हा उपक्रम नाविन्यपूर्ण असून अश्या पद्धतीच्या ॲपची निश्चितच गरज आहे.ऑल इन वन गुरूजी या संस्थेने उचललेले हे पाऊल अभिनंदनीय आहे.प्रमुख अतिथी मीना गोडखिंडी म्हणाल्या आपली भारतीय संस्कृती सर्वश्रेष्ठ, प्रगल्भ व विज्ञाननिष्ठ संस्कृती आहे.याच पार्श्वभूमीवर बदलत्या काळाची गरज ओळखून त्याला अत्याधुनिक तंत्रज्ञानाची प्रगल्भ जोड देऊन आमची पूजा तुमची प्रार्थना या लक्षवेधी शिर्षका अंतर्गत ऑल इन वन गुरूजी या संस्थेने सकारात्मक दिशादर्शक व समाजाभिमुख उपक्रमाचा श्री गणेशा केला आहे. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन व शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाच्या सुत्रसंचलन व आभार प्रदर्शनाची जबाबदारी दीपाली काळे यांनी सांभाळली. कार्यक्रमाची वैशिष्ट्ये म्हणजे पारंपरिक वेशभूषेतील महिला वर्ग, मंत्रजागर, शांतीपाठ व प्रार्थना यामुळे अवघे वातावरण मांगल्यमय झाले होते. कार्यक्रमाआधी पत्रकार परिषद घेऊन माहिती देण्यात आली होती.