विजय वडेट्टीवारांची माहिती
मुंबई: गेल्या सात महिन्यांमध्ये महाराष्ट्रात १,५५५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची विभागनिहाय आकडेवारी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (vijay vadattiwar) यांनी ट्विटरच्या माध्यमातून समोर आणली आहे.
सतत येणारा पूर, नापिकी, दुष्काळ, शेतमालाला हमीभाव न मिळणे अशा अनेक कारणांमुळे शेतकरी आत्महत्येचे पाऊल उचलत आहेत. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी त्यांच्या ट्विटरच्या माध्यमातून महाराष्ट्रात १ जानेवारी २०२३ ते ३१ जुलैपर्यंत २०२३ या सात महिन्यांत तब्बल १,५५५ शेतकऱ्यांनी दुष्काळ व कर्जबाजारीपणाला कंटाळून आपले जीवन संपवले असून अमरावतील विभागात सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या झाल्याची नोंद आहे तर अमरावती विभागात गेल्या ७ महिन्यांमध्ये तब्बल ६३७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती ट्वीट करत दिली आहे.
राज्यात यंदा पुरेसा पाऊस झालेला नाही. पावसाअभावी राज्यातल्या अनेक भागांमधील पिकांचे नुकसान झाले आहे. तर मान्सूनच्या सुरुवातीला विदर्भातील काही भागांना पूराचा तडाखा बसला होता. बुलढाण्यातील अनेक गावं अद्याप त्यातून सावरलेली नाहीत. गेल्या काही महिन्यांपासून राज्यातले शेतकरी सातत्याने नवनव्या आव्हानांना तोंड देत आहे. पूर, नापिकी, दुष्काळ, शेतमालाला हमीभाव न मिळणे अशा अनेक कारणांमुळे शेतकरी मेटाकुटीला आहे. दरम्यान, राज्यात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाणही वाढले असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.
- अमरावती विभागात ६३७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या
अमरावती १८३
बुलढाणा १७३
यवतमाळ १४९
अकोला ९४
वाशीम ३८
- औरंगाबाद विभागात ५८४ शेतकरी आत्महत्या
बीड १५५
उस्मानाबाद (धाराशिव) १०२
नांदेड ९९
औरंगाबाद ८६
परभणी ५१
जालना ३६
लातूर ३५
हिंगोली २०
- नाशिक विभागात १७४ शेतकरी आत्महत्या
जळगाव ९३
अहमदनगर ४३
धुळे २८
नाशिक ०७
नंदुरबार ०३
- नागपूर विभागात १४४ शेतकरी आत्महत्या
चंद्रपूर ७३
वर्धा ५०
नागपूर १३
भंडारा ०५
गोंदिया ०३
- पुणे विभागात १६ शेतकरी आत्महत्या
सोलापूर १३
सातारा ०२
सांगली ०१
(पुणे आणि कोल्हापूरशून्य शेतकरी आत्महत्या)
कोकण विभागात शेतकरी आत्महत्या नाही
जून महिन्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या
जानेवारी २२६
फेब्रुवारी १९२
मार्च २२६
एप्रिल २२५
मे २२४
जून २३३
जुलै २२९
